श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची घोषणा; मतदार यादी अद्यावतीकरणासाठी ‘बीएलए’ची नियुक्ती.
। लोकजागर । फलटण । ३ मे २०२६ ।
शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात आणि वस्तीवस्तीवर शाखा सुरू करण्याचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ११ मे ते १७ मे या कालावधीत फलटण तालुक्यात १०० नवीन शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतदार यादी अद्यावतीकरणावर भर: मतदान याद्यांच्या अद्यावतीकरणाचे काम सध्या सुरू असून, शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पक्षातर्फे ‘बी.एल.ए.’ (बूथ लेव्हल एजंट) नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फलटण-कोरेगाव मतदारसंघासाठी विराज खराडे यांची ‘बी.एल.ए. १’ (BLA-1) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पुढील नियुक्त्यांचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. पात्र मतदार यादीत समाविष्ट राहतील, याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जाईल, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
पक्ष बांधणीसाठी सज्ज: माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील कार्यरत असून, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात या नवीन शाखांचा उपयोग पक्ष विस्तारासाठी निश्चितपणे होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील, शिवसेना नेते पै. संतोष (आबा) वेताळ, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
