। लोकजागर । पुणे । ७ मे २०२६ ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दिनांक ८ मे रोजी दुपारी ठीक १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.
परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील. यामध्ये results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि sscresult.mkcl.org यांसह इतर अधिकृत पोर्टल्सचा समावेश आहे. विद्यार्थी त्यांच्या गुणांची प्रिंट आउट घेऊ शकतील, तसेच डिजीलॉकर ॲपमध्ये (Digilocker App) आपली डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ‘इन स्कूल लॉगिन’ची सुविधा देण्यात आली आहे.
निकालाच्या घोषणेनंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध असेल. श्रेणी विषयांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनिवार्य विषयासाठी विद्यार्थी स्वतः किंवा शाळेमार्फत मंडळाच्या संकेतस्थळावरून विहित अटी व शर्तींनुसार अर्ज करू शकतील. निकालाच्या या अधिकृत घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
अधिकृत संकेतस्थळे
1) https://results.digilocker.gov.in
2) https://mahahsscboard.in
3) https://sscresult.mkcl.org
4) https://results.targetpublications.org
5) https://results.navneet.com
6) https://www.tv9marathi.com आणि
7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc–10-results
