। लोकजागर । फलटण । ८ मे २०२६ ।
फलटण शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकण्यासाठी फलटण नगर परिषदेच्या विशेष आढावा बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत फलटणच्या वैभवात भर पडेल अशा सूचना दिल्या असून, प्रामुख्याने नगरपरिषदेच्या आवारात महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा भव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच शहराच्या विविध भागांत छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे उभारले जाणार आहेत.
या सर्व प्रस्तावित पुतळ्यांच्या उभारणीच्या कामाचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) प्रसिद्ध आर्किटेक्ट रोहन बळीप यांनी यावेळी केले. या बैठकीला आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेर नाईक निंबाळकर आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या सौंदर्यीकरणात आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यात हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शहरात उभारण्यात येणाऱ्या इतर पुतळ्यांचे स्वरूप आणि ठिकाण:
या सादरीकरण बैठकीत शहरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या इतर तीन पुतळ्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली:
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा: शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, महाराजांचा जुना जो पुतळा आहे तो काढला जाणार नसून, नवीन अश्वारूढ पुतळ्याच्या पुढे तो सन्मानाने बसवण्यात येणार आहे.
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा: पाचबत्ती चौक ते बारामती चौक रोडवर (सिमेंट रोडची सुरुवात) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. फलटण शहरात अण्णाभाऊंचा पुतळा पहिल्यांदाच बसवला जाणार आहे.
- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा: पृथ्वी चौक (राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक) येथे एका बाजूला (डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
सर्व पुतळे लवकरात लवकर उभारणार – नगराध्यक्ष समशेरसिंह
यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्वाही दिली की, फलटणमध्ये बसत असलेले हे चारही पुतळे लवकरात लवकर आणि पूर्ण सन्मानाने उभारले जातील. आज चारही पुतळा समित्यांनी जे निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसारच पुतळे बसवण्यात येतील अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.
या आढावा बैठकीस भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे फलटणकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून शहराच्या सौंदर्यात यामुळे भर पडणार आहे.
