दुधेबावी येथे श्री संत बाळूमामा अमावस्या भंडारा उत्सव उत्साहात; कीर्तनाला भाविकांची मोठी गर्दी.
। लोकजागर । फलटण / दुधेबावी । २० मे २०२६ ।
सध्याच्या धावपळीच्या युगात तरुण मुलांना आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसाठी वेळ नसतो. अनेकजण देवदर्शनासाठी अगदी परदेशात किंवा बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला जातात. परंतु, घराबाहेर देव शोधण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्या आई-वडिलांची मनापासून सेवा केली तर बाळूमामा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत, असे भावनिक आवाहन प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. नवनाथ महाराज कोलवडकर यांनी केले. दुधेबावी (ता. फलटण) येथे श्री संत बाळूमामा अमावस्या भंडारा उत्सवानिमित्त आयोजित विशेष कीर्तन सेवेत ते बोलत होते.
कीर्तनात पुढे बोलताना महाराज म्हणाले की, श्री संत बाळूमामा हे जगाच्या पाठीवर असे महान संत आहेत की, तुमची जर मेंढी माऊलीवर आणि गोरगरिबांवर खरी श्रद्धा व सेवा असेल, तर ते कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. तुमचे जर कर्म चांगले नसेल, तर जगाचा बाप जरी आला तरी तो तुम्हाला वाचवू शकत नाही. कर्म आणि सेवा यातच खरा देव आहे. बाळूमामाच्या दरबारात जाताना कधीही काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका, तर त्यांनी आजपर्यंत आपल्याला जे काही दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी जा, अशी महत्त्वपूर्ण शिकवण त्यांनी यावेळी भाविकांना दिली.
संत बाळूमामा हे बहुजन प्रतिपालक आणि जनसामान्यांचे लोकदैवत मानले जात असून त्यांनी समाजाला श्रद्धा, सेवा, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला आहे. ग्रामीण भागातील अनेक भक्त आजही त्यांच्या या पवित्र शिकवणीचे मनापासून पालन करताना दिसतात. त्यांच्याच विचारांचा वसा पुढे चालवत दुधेबावी येथे दरवर्षी या अखंड सेवा व धार्मिक कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले जाते. या कीर्तन प्रसंगी उपस्थित हजारो भाविकांनी “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” असा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांकडून आवश्यक त्या सर्व सुविधा व सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
