कोल्हापूर येथे २४ मे रोजी होणार दिमाखदार वितरण सोहळा; महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे हे आहे महत्त्वपूर्ण प्रकाशन.
। लोकजागर । फलटण / कोल्हापूर । २३ मे २०२६ ।
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरच्या वतीने वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिले जाणारे मानाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये फलटणचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रवींद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेल्या व संपादित केलेल्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्त्वाचा एक शोध’ या बहुचर्चित त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथाला ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या या पुरस्कारामुळे रवींद्र बेडकिहाळ यांच्या सखोल संशोधन वृत्तीचा आणि साहित्यिक योगदानाचा गौरव झाला असून, फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारिता व साहित्यिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कार प्राप्त ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे त्रिखंडात्मक चरित्र महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळा’ने प्रकाशित केले आहे. लेखक रवींद्र बेडकिहाळ यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर अत्यंत सखोल आणि प्रदीर्घ संशोधन करून या ऐतिहासिक त्रिखंडात्मक चरित्राचे लेखन व संपादन केले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र, ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक, यासोबतच त्यांनी इतिहास, समाजसुधारणा, शिक्षण, गणित आणि वैज्ञानिक संशोधन अशा विविध क्षेत्रांत केलेले उत्तुंग कार्य व त्यांची दूरदृष्टी, यावर या त्रिखंडात्मक चरित्रात अतिशय विस्तृतपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. मराठी पत्रकारांसाठी, संशोधकांसाठी आणि अभ्यासकांसाठी हा ग्रंथ एक अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठेवा ठरला आहे.
२४ मे रोजी कोल्हापुरात गौरव सोहळा: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा हा भव्य ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता, कोल्हापूर येथील उद्यम नगरमधील ‘शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल’ येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. विजय चोरमरे आणि प्रा. डॉ. रामकली पावसकर लाभणार आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष आ. दि. बा. पाटील, उपाध्यक्ष गौरी भोगले आणि कार्यवाह विनोद कांबळे यांनी या सोहळ्याला सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
इतर प्रमुख पुरस्कार विजेते: या सोहळ्यात इतरही अनेक दिग्गजांचा गौरव होणार आहे. यामध्ये वि. स. खांडेकर पुरस्कार नितीन कोत्तापल्ले (‘गुरु एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न’), कोयनामाई पुरस्कार अभिनेत्री चिन्मयी सुमीत, जनाबाई पुरस्कार प्रतिभा खैरनार (‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’) आणि सावित्रीमाई पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना प्रदान केला जाईल. (हे सर्व पुरस्कार प्रा. डॉ. रामकली पावसकर पुरस्कृत आहेत). याशिवाय धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार अजीम नवाज राही (‘वळीवाच्या वेळा’) यांना, तर देवदत्त पाटील पुरस्कार शशिकांत चौधरी व रमेश साळुंखे यांना आणि शंकर खंडू पाटील पुरस्कार निलांबरी कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. तसेच अण्णा भाऊ साठे पुरस्कार रवींद्र ठाकूर, कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार धनंजय बिजले, शैला सायनाकर पुरस्कार चंद्रकांत बाबर, चैतन्य माने पुरस्कार महानंदा मोहिते आणि बालवाङ्मय पुरस्कार श्रीयांश हराडे यांना जाहीर झाला असून, विशेष पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये सोनिया पाटील, रमेश जावीर, मधुकर जाधव, अर्जुन व्हटकर, राजेंद्र घाडगे, संजय ठिगळे, लवकुमार मुळे, सचिन अवघडे, रवी बावडेकर, सुनील साळुंखे, सिद्धार्थ कांबळे, सुधाकर इनामदार, दीपाली घाडगे, संजय वारके, स्वाती पाटील, प्रकाश कुलकर्णी, सुरज चौगुले आणि चारुदत्त कासार यांच्या साहित्यकृतींचा गौरव करण्यात येणार आहे.
