प्राचार्य शिवाजीराव भोसले हे मराठी भाषा भूषण; जन्मशताब्दी वर्षात विवेकी विचाराचा जागर करूया : मिलिंद जोशी

फलटणमध्ये ‘महाराजा आयकॉन’ येथे स्मृतीदिनानिमित्त विशेष बैठक संपन्न

। लोकजागर वृत्त । फलटण । 7 जुलै 2026 ।

महाराष्ट्राला खर्‍या अर्थाने वैचारिक प्रबोधनाचा प्रकाश दाखवण्याचे महान काम प्राचार्यांनी केले आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे म्हणजेच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विस्मरण महाराष्ट्राला कधीही होता कामा नये. खरे तर महाराष्ट्राने त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच केला आहे; त्यांना आजवर ’महाराष्ट्र भूषण’ किंवा ’पद्मश्री’ सारखे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळायला काहीच हरकत नव्हती. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे केवळ फलटणचे भूषण नसून किंबहुना ते संपूर्ण मराठी भाषा भूषण आहेत. ते वक्तृत्वातील खरे ‘शिवाजी’ होते, म्हणूनच त्यांच्या या आगामी जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून त्यांच्या विचारांचा यथोचित जागर केला पाहिजे, आणि यामध्ये फलटणकरांनी घेतलेला पुढाकार अत्यंत आनंददायी आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध वक्ते तथा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे संस्थापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

सुप्रसिद्ध वक्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 15 जुलैपासून सुरू होत आहे. या जन्मशताब्दी महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यामागची वैचारिक भूमिका निश्चित करण्यासाठी फलटण येथील ‘महाराजा आयकॉन’ येथे प्राचार्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून मिलिंद जोशी बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे सुपुत्र संजीव भोसले, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख ऍड. सौ. मधुबाला भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधी सौ. अलका बेडकिहाळ आणि महात्मा शिक्षण संस्थेचे प्रमुख दादासाहेब चोरमले उपस्थित होते. याशिवाय म.सा.प. फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, कार्यवाह अमर शेंडे, ज्येष्ठ सदस्य प्राचार्य शांताराम आवटे, प्राचार्य रवींद्र येवले, विक्रम आपटे, मधुकर जाधव, हिरालाल गांधी, प्रमोद गोळे, श्रेयस कांबळे, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खरात आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

बैठकीत पुढे बोलताना मिलिंद जोशी यांनी सांगितले की, भोसले सरांचे कर्तृत्व कोणत्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून भारत व भारताबाहेर पोहोचलेला वक्ता असे त्यांचे जागतिक वेगळेपण आहे. अगदी कलेढोण ते कॅलिफोर्निया असा त्यांचा वक्ता म्हणून झालेला प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना कुठलेही व्यासपीठ आणि कोणताही विषय कधीही वर्ज्य नव्हता. मराठी वक्तृत्वाचे दीपस्तंभ म्हणून संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहते, म्हणूनच सरांच्या या उदात्त विचारांचा जागर या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर झाला पाहिजे. शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने त्यांच्या जयंतीदिनी गेली 16 वर्षे आम्ही पुण्यात नियमितपणे पुरस्कार देत आहोत. याच परंपरेनुसार, प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रेमींचा एक भव्य स्नेह मेळावा येत्या 15 जुलै रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात सायंकाळी 4:30 वाजता आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये या जन्मशताब्दी वर्षाविषयी उपस्थितांच्या आणखीन नवनवीन कल्पना जाणून घेतल्या जातील. तरी या मेळेाव्यात भोसले सरांचे माजी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. नियोजित जन्मशताब्दी समिती 25 सदस्यांची करावी असा विचार असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश केला जाईल. या निमित्ताने एका दर्जेदार गौरव ग्रंथाची निर्मिती केली जाईल, ज्यामध्ये प्राचार्यांचे विद्यार्थी आणि श्रोते यांचेही वैयक्तिक अनुभव घेतले जातील. तसेच स्थानिक पातळीवर प्राचार्यांच्या निवासस्थानापाशी आणि फलटणमधील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांच्या दर्शनी भागात प्राचार्यांविषयी सविस्तर माहिती फलक लावण्यात यावेत, आणि फलटणमधील नियोजित ग्रंथालयात त्यांचा एक देखणा अर्धपुतळा बसवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी महत्त्वपूर्ण घोषणा करताना दिलीपसिंह भोसले म्हणाले की, प्राचार्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून फलटण शहरात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावे एक अत्यंत अद्ययावत व उत्तम ग्रंथालय आम्ही उभारणार असून, ते पुढील व्यवस्थापनासाठी व चालवण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेकडे सुपूर्द केले जाईल. आजच्या काळात प्राध्यापक आणि शिक्षकांचे प्रबोधन करणे गरजेचे असून, यंदाच्या वर्षी आयोजित केल्या जाणार्‍या व्याख्यानमालेच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व स्तरातील शिक्षक व प्राध्यापक यांचे प्रबोधन करता येईल. यासाठी मिलिंद जोशी यांनी राज्यस्तरावरील नावाजलेले व्याख्याते उपलब्ध करून द्यावेत, तसेच नियोजित राज्यस्तरीय जन्मशताब्दी समितीच्या सर्व उपक्रमांना श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूह आर्थिक व सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, या नियोजित राज्यस्तरीय जन्मशताब्दी समितीच्या माध्यमातून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा ज्या ज्या शहरांत किंवा ठिकाणी मोठा राबता आणि संचार राहिला आहे, त्या सर्व ठिकाणी व्याख्याने, परिसंवाद आणि वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. प्राचार्यांचे हे अमूल्य विचारधन सर्वत्र पोहोचवण्यासाठी एक राज्यस्तरीय स्मृतीग्रंथ तयार केला जाईल. तसेच प्राचार्यांच्या वक्तृत्वाचा अथांग आयाम लक्षात घेऊन ’प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व करंडक’ स्पर्धा पुण्यासारख्या मोठ्या शहरातून कायमस्वरूपी सुरू केली जाईल, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राचार्यांच्या नावे अधिकृत ’अध्यासन’ (चेअर) सुरू करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी जन्मशताब्दी निमित्त उत्तम गौरव अंक प्रकाशित व्हावा असे सूचित करताना या ग्रंथात भोसले सरांच्या जीवनातील विविध टप्पे लेखांच्या माध्यमातून यावेत तसेच त्यांच्या छायाचित्रांचा संग्रहही यामध्ये व्हावा. तर अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी जन्मशताब्दीच्यानिमित्ताने वाचनसंस्कृती वृद्धींगत होण्याविषयीच्या उपक्रमांविषयी महत्त्वपूर्ण कल्पना मांडल्या.

यावेळी जन्मशताब्दीनिमित्त नियोजित कार्यक्रमांसाठी प्रा. मधुकर जाधव यांनी रुपये 11 हजार तर दादासाहेब चोरमले यांनी रुपये 7 हजारांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीदिनानिमित्त प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नियोजित प्राचार्य शिवाजीराव भोसले ग्रंथालयासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या वतीने प्राचार्यांची एक सुंदर प्रतिमा दिलीपसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. बैठकीदरम्यान उपस्थितांनी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपयुक्त कल्पना मांडल्या. शेवटी, नुकतेच दिवंगत झालेले महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी यांनाही या बैठकीदरम्यान सर्व सदस्यांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. बैठकीस उपस्थितांचे आभार अमर शेंडे यांनी मानले.

Spread the love