वय ७९ असले तरी मी दुबळा नाही : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर प्रहार

। लोकजागर वृत्त । फलटण । २० जुलै २०२६ ।

वय ७९ वर्षांचे असले तरी मी अजिबात दुबळा झालेलो नाही आणि फलटणच्या जनतेसाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. लोक सोबत राहो अथवा न राहो, तरीही माझा हा लढा सुरूच राहील. कोणत्याही परिस्थितीत पराभव पत्करून फलटणच्या लोकांच्या हितासाठी सर्वकाही पूर्ववत स्थितीत आणणे ही आमच्या घराण्याची संस्कृती आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरून फलटण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हा कारखाना भागीदारी तत्त्वावर चालवण्यास प्रशासनाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या नावे कर्ज उभारून तो कोणत्याही परिस्थितीत सुरू करून दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी सभासदांना त्यांचे थकीत शेअर्स पूर्ण करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या आवाहनाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठिंबा दर्शवत स्वतःचे शेअर्स पूर्ण करण्याची घोषणा केली होती. या सर्व राजकीय घडामोडींवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, आपला कोणालाही वैयक्तिक विरोध नाही, परंतु दुसऱ्याचे ओरबडून घेण्याच्या प्रवृत्तीला आपला तीव्र विरोध आहे. विरोधकांनी थेट निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान देत आपल्या पूर्वजांच्या त्यागातून ही सर्व संस्थात्मक उभारणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतमुक्त फलटण करणे हेच आपले अंतिम ध्येय असून, श्रीराम कारखाना कसा बंद पडेल यासाठीच विरोधकांकडून पातळीहीन राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले उत्तम संबंध असून, या राजकारणात शेतकरी भरडला जाऊ नये यासाठी केवळ पक्षाचे आहेत म्हणून विरोधकांच्या हाती सत्ता देऊ नये, अन्यथा यात तुमची बदनामी होईल, असा थेट संदेश आपण मुख्यमंत्र्यांना पाठवला असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी श्रीराम कारखान्याच्या कार्यपद्धतीला विरोध करणारे प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरुपराजे खर्डेकर आणि विश्वासराव भोसले यांच्यावरही जोरदार टीका केली.

या प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, शेअर्स पूर्ण करण्याचे जाहीर विधान करणे यात केवळ राजकारण आहे. श्रीराम हा तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून, सध्या राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची परिस्थिती बिकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने आणि सभासदांनी एक सुवर्णमध्य काढला होता, परंतु विरोधकांनी या प्रक्रियेला स्थगिती आणली. निवडणूक वेळेवर झाली असती तर हे सर्व प्रश्न निर्माण झाले नसते. सहकारी कारखान्याची भागीदारी खाजगी संस्थेशी केली तरी त्याचे मूळ स्वरूप सहकारीच राहते, ते खाजगी होत नाही. कारखान्याचे खाजगीकरण केले जात असल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. जर विरोधकांना सहकाराचा एवढा पुळका होता, तर त्यांनी स्वतःचे खाजगी कारखाने का काढले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांच्या या भूमिकेमुळे आज श्रीराम कारखान्याचे कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार आणि संपूर्ण गाळप हंगाम धोक्यात आला आहे.

बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले की, सभासद रामराजे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शेअर्स पूर्ण करत आहेत. जर विरोधकांना खरोखरच कारखाना सुरू करायचा असेल तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून भागीदारी तत्त्वावरील निर्णयाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. श्रीराम कारखाना हा सहकारी तत्त्वावरच चालत आला असून भविष्यातही तो याच तत्त्वावर चालवला जाईल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Spread the love