सातारा जिल्हा संघटनेकडून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्याचा निर्धार.
। लोकजागर वृत्त । फलटण । २७ ऑगस्ट २०२६ ।
फलटण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, जिल्हा कार्याध्यक्ष तथा निवडणूक निरीक्षक संजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा सचिव इमरान मुल्ला, माण तालुका सचिव दयानंद जगदाळे, तसेच सातारा तालुका माजी अध्यक्ष व पुणे माध्यमिक पतसंस्थेचे संचालक श्रीरंग सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी फलटण तालुक्यातील शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी राहुल कृष्णराव बोबडे आणि कार्याध्यक्षपदी दत्ता प्रकाश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून हरिभाऊ रामचंद्र मोरे तर कोषाध्यक्ष म्हणून शंकर बापूराव वाघमारे जबाबदारी सांभाळणार आहेत. उपाध्यक्षपदी दत्तात्रय दिनकर भोसले आणि उपाध्यक्ष सेवकपदी मल्हारी सोपान कोळेकर यांची निवड झाली आहे. याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून विजय भानुदास जगताप, अमित अरविंद कदम, अमर रमेशचंद्र शेंडे आणि विष्णू नारायण शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतर बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी, समस्या सोडविण्यासाठी आणि संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी आगामी काळात सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
