ज्येष्ठ मुद्रण व्यावसायिक बकुळ पराडकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार संपन्न; सांस्कृतिक व साहित्यिक विश्‍वात शोककळा

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ जुलै २०२६ ।

फलटण येथील प्रसिद्ध मुद्रण व्यावसायिक, ’विद्यामृत प्रकाशनचे प्रमुख तसेच अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर (वय ६६) यांच्या पार्थिवावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. फलटण शहरातील सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट संयोजक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले होते.

फलटण शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट संयोजक अशी त्यांची ख्याती होती. संगीत क्षेत्रातील जगविख्यात मंगेशकर कुटुंबातील सर्व सदस्यांशी त्यांचे गेल्या दोन दशकांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या याच स्नेहामुळे मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी फलटणला भेट दिली होती. फलटणच्या नाईक निंबाळकर राज घराण्याचेही ते निकटवर्तीय होते. विद्यामृत प्रकाशन आणि प्रिंटिंग प्रेस ही सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एक अत्यंत जुनी आणि नावाजलेली मुद्रण व प्रकाशन संस्था आहे. दिवंगत ज्येष्ठ मुद्रण व्यावसायिक बकुळ पराडकर यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने फलटणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्‍वात मोलाचे स्थान निर्माण केले. विद्यामृत प्रकाशनाने स्थानिक आणि ग्रामीण भागातील लेखकांच्या साहित्याला व्यासपीठ मिळवून दिले. अनेक स्थानिक कवी, लेखक आणि विचारवंतांची पुस्तके या प्रकाशनातून प्रसिद्ध झाली आहेत. बकुळ पराडकर यांनी या संस्थेचा वापर फलटणमधील वैचारिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केला. विविध पुस्तक प्रकाशन सोहळ्यांचे आयोजन या संस्थेच्या माध्यमातून किंवा सहकार्याने केले जायचे. फलटणमधील ‘अनुबंध कला मंडळा’च्या माध्यमातूनही सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात ते अग्रभागी होते.

पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्राचार्य रवींद्र येवले, अ‍ॅड. मिलींद लाटकर, डॉ. महेश बर्वे, डॉ. पार्श्‍वनाथ राजवैद्य (गुंगा), अनुबंध कला मंडळाचे अशोक भोईटे, उस्मान शेख, हिरालाल गांधी, विजय जाधव, मुद्रण व्यावसायिक उमेश निंबाळकर, रमण रणदिवे, अजय दाते, धनंजय निंबाळकर, अतुल पेंढारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Spread the love