फरीदाबाद येथील ‘रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी’ संस्थेकडून शोधप्रबंधास मंजुरी; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव.
। लोकजागर वृत्त । फलटण । ६ ऑगस्ट २०२६ ।
फलटण येथील मूळ रहिवासी आणि गुणवंत विद्यार्थी रोहन राजीव बाबर यांना ‘रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, फरीदाबाद’ (RCB) कडून पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. २४ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या मौखिक परीक्षेत त्यांनी आपल्या शोधप्रबंधाचे यशस्वी सादरीकरण केले. रोहन यांनी ‘Studies on the role of deSUMOylases in Colitis-Associated Colorectal Cancer (CAC)’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे.
रोहन बाबर हे फलटण येथील मुधोजी हायस्कूलचे आणि बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे (विद्यानगरी) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थेतून हे यश संपादन केले आहे.
रोहन यांच्या या बहुमानामुळे फलटण परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक, विद्यापीठाचे प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, बाबर परिवार, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
