नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर अवैध चायना व नायलॉन मांजावर कडक कारवाई करा; नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीची मागणी!

फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन; साठवणूक, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑगस्ट २०२६ ।

नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व परिसरात अवैध चायना आणि नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण’च्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अवैध चायना व नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा मांजा अत्यंत धारदार व अविघटनशील असल्यामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी व इतर वन्यजीवांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होतो. दरवर्षी अशा मांजामुळे अनेक अपघात घडतात, तसेच पक्षी जखमी अथवा मृत झाल्याच्या घटनाही समोर येतात.

महाराष्ट्र शासनाने चायना व नायलॉन मांजाच्या उत्पादन, विक्री, साठवण आणि वापरावर बंदी घातलेली असून त्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रतिबंधित मांजाचा वापर हा अत्यंत गंभीर बाब आहे.

त्यामुळे फलटण शहर व परिसरात अवैध चायना व नायलॉन मांजाची विक्री, साठवण व वापर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित ठिकाणी तातडीने तपासणी मोहीम राबवून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशी नम्र विनंती नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनाची फलटण नगरपरिषदेच्या बारनिशी लिपीकांकडून पोच घेण्यात आली आहे.

Spread the love