रवींद्र बेडकिहाळ लिखित ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ ग्रंथाला राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार’!

अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारातर्फे घोषणा; २३ ऑगस्ट रोजी सातारा येथे होणार भव्य गौरव सोहळा.

। लोकजागर वृत्त । फलटण । १७ ऑगस्ट २०२६ ।

फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांनी लेखन व संपादन केलेल्या ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ (खंड १ ते ३) या त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथाला कॅ. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा आयोजित १४ व्या राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे.

हा त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’ या संस्थेने प्रकाशित केला आहे. लेखक रवींद्र बेडकिहाळ यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या बहुआयामी जीवनावर प्रदीर्घ व सखोल संशोधन करून हा ऐतिहासिक ग्रंथप्रपंच साकारला आहे. आद्य पत्रकारांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आणि ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक, यासोबतच त्यांनी इतिहास, शिक्षण, गणित आणि वैज्ञानिक संशोधन अशा विविध क्षेत्रांत केलेले उत्तुंग कार्य या ग्रंथात विस्तृतपणे मांडले आहे. मराठी पत्रकारांसाठी, अभ्यासकांसाठी आणि संशोधकांसाठी हा ग्रंथ एक अनमोल मार्गदर्शक ठेवा मानला जात आहे.

या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘कॅ. भाऊसाहेब सोमण सभागृह, मारुती मंदिरावरती, राजवाडा MSEB ऑफिस जवळ, राजवाडा चौपाटी, सातारा’ येथे करण्यात आले आहे.

ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या हस्ते आणि कवी व गझलकार धनंजय तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष राजेंद्र माने, कार्यवाह शशीभूषण जाधव, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष डी. एम. मोहिते तसेच श्रीधर साळुंखे, स्वप्नील शिंदे, गौतम भोसले, नंदाताई जाधव आणि सुनिता कदम यांनी केले आहे.

Spread the love