बंद पथदिवे तातडीने सुरू करा : नागरिकांची मागणी
। लोकजागर वृत्त । फलटण । १८ ऑगस्ट २०२६ ।
फलटण शहरातील गिरवी नाका परिसर ते पिरॅमिड चौक या अत्यंत महत्त्वाच्या रिंग रोडवरील बंद असलेले जुने पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे. गिरवी नाका परिसर ते पिरॅमिड चौक या रिंग रोडवरील नवीन पथदिवे कंत्राटदाराच्या तांत्रिक चुकांमुळे काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी असलेले जुने पथदिवेही बंद अवस्थेत असल्याने या संपूर्ण परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
विमानतळ परिसरातून सायंकाळच्या वेळेला अनेक नागरिक पायी चालण्यासाठी येत असतात, त्यांनाही या अंधाराचा मोठा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पिरॅमिड चौकच्या बाजूने असलेले शेवटचे तीन-चार पथदिवे सुरू असून तिथपासून मात्र गिरवी नाक्यापर्यंत पूर्ण काळोख पाहायला मिळत आहे. नवीन पथदिव्यांना आलेल्या अडचणींमुळे कामगार वसाहत आणि शासकीय विश्रामगृह या ठिकाणचा रस्ताही पूर्णपणे अंधारात असल्याचे चित्र आहे.
रिंग रोडवरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील जुने पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. अंधारामुळे या मार्गावर अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे प्रशासनाने आणि नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन गिरवी नाका ते पिरॅमिड चौक दरम्यानचे बंद असलेले सर्व पथदिवे पूर्ववत सुरू करावेत, अशी जोरदार मागणी फलटण शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
