नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी व सहयोग सोशल फाउंडेशनचा उपक्रम; मुधोजी क्लब परिसरात स्वच्छता मोहीम.
। लोकजागर वृत्त । फलटण । १७ ऑगस्ट २०२६ ।
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवात वापरल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या चायना व नायलॉन मांजाविरोधात ‘नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण’ यांच्या वतीने राबवण्यात आलेले व्यापक जनजागृती अभियान उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
प्रभातफेरीच्या दोन-तीन दिवस आधी ऑडिओ क्लिपद्वारे फलटण शहरात जनजागृती करण्यात आली. तसेच महात्मा फुले चौक येथे स्क्रीनवर जनजागृतीपर व्हिडिओ चित्रफित दाखवून चायना मांजामुळे पक्षी, वन्यजीव व नागरिकांना होणाऱ्या धोक्याबाबत प्रबोधन करण्यात आले. चायना मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित शासकीय विभागांना निवेदनेही देण्यात आली.
रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक, फलटण येथून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमाचे सहआयोजक सहयोग सोशल फाउंडेशन होते. या वेळी आकांक्षा क्लासेस, वन विभाग फलटण, रोटरी क्लब फलटण, गोविंद फाउंडेशन व योद्धा अकॅडेमी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रभातफेरीदरम्यान “पतंग उडवा… पण जीव वाचवून! सण साजरा करा… पण निसर्ग जपून! चायना मांजाला नकार द्या… आणि पक्ष्यांना अभय द्या!” असा संदेश देण्यात आला.
याच वेळी मुधोजी क्लब ग्राउंड परिसरात संस्थेच्या सदस्यांनी प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या प्रसंगी देण्यात आला.
दरम्यान, १५ व १६ ऑगस्ट रोजी सहयोग सोशल फाउंडेशन व नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
