एकात्मिक खत व्यवस्थापनाने शेती खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचा सल्ला; सचिन जाधव यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑगस्ट २०२६ ।
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिवसानिमित्त सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रासायनिक खतांची उपलब्धता, पुरवठा आणि त्यांचा योग्य वापर याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांच्या उपलब्धतेवरून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर सरळ आणि साधा उपाय म्हणजे उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खत व जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर करणे होय, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
रासायनिक खतांचा वापर करताना जमिनीची सुपीकता, पिकांची गरज आणि उपलब्ध अन्नद्रव्यांचा विचार करणे आवश्यक आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या व कार्यक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय व जैविक खतांचा उपयोग होतो. परिणामी जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट तसेच जैविक खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य टिकविणे ही पुढील पिढ्यांसाठीची जबाबदारी असून, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे आणि माती परीक्षण करून पिकाच्या गरजेनुसारच एकात्मिक खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमादरम्यान सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी कृषी सखी कोमल मुळीक यांच्यासह हिरालाल मुळीक, रवींद्र झांजुर्णे, नामदेव मुळीक, दत्तात्रय चांगण, ज्ञानदेव मुळीक तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच शेती अधिक शाश्वत बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.
