फलटण एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात
। लोकजागर वृत्त । फलटण । २६ ऑगस्ट २०२६ ।
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आधुनिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर जाऊन त्यांना विषय समजेल, पटेल आणि रुचेल अशा पद्धतीने अध्यापन करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात काळानुरूप सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही या बदलांचे शिक्षण घेत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. प्रशिक्षित शिक्षक हाच शिक्षण संस्थेचा पाया असला पाहिजे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचा ७५ वा वर्धापन दिन तथा मुधोजी दिन अनंत मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, प्राचार्य विश्वासराव देशमुख, हेमंत रानडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, चंद्रकांत रणवरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, शिक्षक व सेवकवृंद उपस्थित होते.
आ. रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, आपल्या परंपरा आणि मूल्ये जपत शिक्षणाचे कार्य पुढे सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या व्यावसायिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आपण या स्पर्धेत टिकू शकणार का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनी नोकरी म्हणून आपले काम निश्चितपणे करावे; मात्र, हे केवळ नोकरीचे काम नसून आपले कर्तव्य आहे, याची जाणीव प्रत्येक शिक्षकाने ठेवली पाहिजे.
कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य आवश्यक
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले, सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवायचे असतील, तर केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही. विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही नैपुण्य मिळवून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात फलटण एज्युकेशन सोसायटीची भरभराट यापेक्षाही अधिक वेगाने होऊन ही संस्था इतर शिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. श्रीमंत मालोजीराजे यांनी फलटण संस्थानात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून स्त्री शिक्षणाला गती दिली. शिक्षणाबरोबरच पाणी, शेती, उद्योग, राजकारण तसेच रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे दळवी यांनी सांगितले.
आज स्वयंसहाय्यित शिक्षण संस्थांशी स्पर्धा करणे हे शिक्षण संस्थांसमोरील मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना संस्थेच्या सर्व शाखा आणि त्यांचे परिसर कालसुसंगत करणे गरजेचे आहे. जुन्या इमारतींचे नूतनीकरण अथवा पुनर्विकास, आकर्षक संरक्षक भिंत आणि स्वागत कमान यासह भौतिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रंथालये आणि प्रयोगशाळाही अद्ययावत असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकासाबाबत व्यवस्थापनाने समग्र विचार करून नियोजन करावे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे शक्य होईल. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कौशल्य विकास या विषयांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमही संस्थेने सुरू करावेत, अशी अपेक्षाही चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या विस्तारात राजघराण्याचे योगदान
प्रास्ताविकात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयाची सुविधा असावी, हे श्रीमंत मालोजीराजे यांचे स्वप्न मुधोजी महाविद्यालयाच्या माध्यमातून साकार झाले. शिक्षणावर नितांत प्रेम असलेल्या श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचा विस्तार झाला. त्यानंतरच्या काळात श्रीमंत उदयसिंहराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्था वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आता आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विविध शाखा यशस्वीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय प्रा. मुकुंद आळतेकर यांच्या स्मरणार्थ फलटण एज्युकेशन सोसायटीला भरीव देणगी दिल्याबद्दल श्रीमती अनुराधा आळतेकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
गुणवंतांचा सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन तसेच अमृत महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या शाखा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व खेळाडू, गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या विविध शाखांच्या शैक्षणिक कार्याची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
