सर्वसमावेशक विकासातून शहराचा चेहरामोहरा बदलणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटणमधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘नमो उद्यान’च्या कामाचा शुभारंभ

। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑगस्ट २०२६ ।

फलटण शहराचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊन व्यापक स्वरूपाचे शहर घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीका होत राहील; मात्र शहरात नागरिकांच्या डोळ्यांसमोर होत असलेला बदल कोणीही नाकारू शकणार नाही. शहराचा विकास करणे, शहर बदलून दाखवणे आणि प्रत्यक्ष बदल घडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग ११ मधील बारवबाग, लक्ष्मीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’च्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची उपस्थिती होती. नमो उद्यानाचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करून हे उद्यान इतरांसाठी मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी परिसरातील नगरसेवकांच्या माध्यमातून कामावर लक्ष दिले जाईल, असे सांगितले. शहरात विरंगुळ्यासाठी चांगली जागा उपलब्ध व्हावी आणि सार्वजनिक उपयोग व्हावा, या दृष्टीने उद्यान विकसित करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती कु. शिवांजली भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

फलटणमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जिम आणि योगा सेंटर उभारण्याचा मानस रणजितसिंह यांनी व्यक्त केला. नमो उद्यानाच्या परिसरात जागा अपुरी पडत असल्याने महिला जिम अन्य ठिकाणी उभारावी लागणार असल्याचे त्यांनी सांगत, नगरपरिषदेच्या माध्यमातून यासाठी काम केले जात असल्याचे नमूद केले. उद्यानामध्ये छोट्या स्वरूपाचे ॲम्फी थिएटर उभारण्याची सूचना सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडली. या सुविधेसाठी निधी कमी पडल्यास अन्य निधीतून तरतूद केली जाईल, असे रणजितसिंह यांनी सांगत या प्रकल्पामुळे सांस्कृतिक व मुलांच्या कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले. फलटण शहरात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याची क्षमता आहे; मात्र पूर्वी आरक्षित असलेल्या काही जागांवरील आरक्षण उठवण्यात आल्याने सार्वजनिक कामांसाठी जागा कमी पडत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

शहरातील मंगळवार पेठेत एकाच दिवशी पाच विकासकामांचे शुभारंभ करण्यात आल्याचा उल्लेख करत प्रत्येक भागात कामे पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालखी महामार्गाचे काम सुरू असून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणखी सुमारे ७० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर होत आहेत, ज्यांची कामे आगामी चार ते सहा महिन्यांत सुरू होतील. शहराचा विकास करताना आजी-माजी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांच्याही सूचना विचारात घेतल्या जात असून टीकाकारांच्या टीकेतील योग्य ते स्वीकारून काम करण्याची आमची भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद चांगले काम करेल असा विश्वास रणजितसिंह यांनी व्यक्त केला.

Spread the love