सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रा. नंदकुमार सागर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले निवेदन; सर्व प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी.

। लोकजागर वृत्त । फलटण । १६ सप्टेंबर २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक शिष्टमंडळाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी संजय यादव, आर. वाय. जाधव, कल्याण शिंदे, सुधाकर जगदाळे, हनुमंत पवार, भरत मोजर, सतीश पिसाळ, तानाजी मिसाळ, राजश्री पवार, विलास गगनमाले यांच्यासह सातारा जिल्ह्यातील वाई, कराड, पाटण, जावली, फलटण, कोरेगाव व महाबळेश्वर तालुक्यातील ३० हून अधिक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

या निवेदनात शिक्षकांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अंशतः व विनाअनुदानित शाळांना तात्काळ १०० टक्के अनुदान लागू करावे, २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय देयके, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता व शालार्थ आयडीच्या तांत्रिक अडचणी त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय आरटीई २००९ कायद्याच्या अगोदर सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी लागू करू नये, संच मान्यतेचे अन्यायकारक निर्णय बदलावेत, पवित्र पोर्टलद्वारे तातडीने १०० टक्के पदांना मान्यता द्यावी आणि १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या २६ हजार ९०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाअट पेन्शन देण्यात यावी, या मागण्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. नंदकुमार सागर म्हणाले की, सातारा जिल्हा हा शिक्षकांचा जिल्हा असून येथील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत आलो असून जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी हा लढा असाच सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Spread the love