लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
। लोकजागर वृत्त । फलटण । १७ सप्टेंबर २०२६ ।
फलटण शहरातील सोमवार पेठ परिसरातील पाटील चौक येथील ‘सोमवार पेठचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आगमन मिरवणूक अत्यंत भव्य आणि विशेष आकर्षक ठरली.
या मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. मिरवणुकीमध्ये विशेष रूपाने साकारण्यात आलेले गोरीला, तात्या विंचू आणि अघोरी कला हे उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरले. हे सर्व देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी पाटील चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
