माऊली फाउंडेशनतर्फे फलटणमध्ये महिलांसाठी विशेष ‘मॅट रांगोळी’ वर्गाचे आयोजन

नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांचा अभिनव पुढाकार; १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान रंगणार सृजनशील उपक्रम.

। लोकजागर वृत्त । फलटण । ३० सप्टेंबर २०२६ ।

फलटण येथील महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना रंगांच्या माध्यमातून सृजनशीलतेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने ‘माऊली फाउंडेशन’च्या वतीने महिलांसाठी विशेष ‘मॅट रांगोळी’ वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या मॅट रांगोळी वर्गाचे आयोजन १, २ आणि ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. महिलांना वेळेचे नियोजन करणे सोयीचे व्हावे, यासाठी या वर्गाची वेळ दुपारी २ ते ५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे या रांगोळी वर्गासाठी लागणारे सर्व आवश्यक साहित्य माऊली फाउंडेशनतर्फेच पुरवले जाणार आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, समाजकल्याण आणि शाश्वत विकास या प्रमुख ध्येयांवर माऊली फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. रंगांच्या उधळणीतून आनंद, सृजन आणि आपलेपणाची नाती गुंफण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आपल्या अंगभूत कलेला नवी दिशा देण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या मॅट रांगोळी वर्गात सहभाग नोंदवावा, असे मनःपूर्वक आवाहन फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी केले आहे.

Spread the love