पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड कायम : दिलीपसिंह भोसले

सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

। लोकजागर वृत्त । फलटण । ३० सप्टेंबर २०२६ ।

सभासदांचा विश्वास जपण्यास संस्था यशस्वी ठरल्यामुळेच संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचे दिसत असून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे, असे प्रतिपादन महाराजा मल्टीस्टेटचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी केले. महाराजा मल्टीस्टेटच्या सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून दिलीपसिंह भोसले बोलत होते. यावेळी सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा मधुबाला भोसले, तुषार गांधी, प्रियदर्शनी भोसले, हेमंत फुले, हणमंत जगताप, विलास रसाळ, भट्टड, दीपराज तावरे, निलेश मोरे, अमोल सस्ते, सुभाष आढाव, सर्व संचालक व शाखा कार्यकारी समितीचे चेअरमन उपस्थित होते.

पुढे बोलताना दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, काटकसरीने व पारदर्शकपणे संचालक मंडळाने कारभार केल्याने आज महाराजा मल्टीस्टेटला तीन वेळा ‘नॅशनल अवॉर्ड’ प्राप्त झालेला आहे. कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने संस्थेचा कारभार व कामकाज केले जात आहे. या तीव्र स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी व सभासदांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळ सतत कार्यशील राहून सेवा देत आहे.

प्रास्ताविकामध्ये बोलताना संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेस २ कोटी ३५ लाख ३ हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच संस्थेने सभासदांना दिलेल्या शब्दानुसार संस्थेचे प्रधान कार्यालय अत्याधुनिक पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. भविष्यात या मल्टीस्टेटचे रूपांतर मल्टीपर्पज संस्थेमध्ये करून त्या माध्यमातून विविध व्यवसाय, हॉस्पिटल आणि शाळा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही रणजितसिंह भोसले यांनी स्पष्ट केले. या सभेचे विषय पत्रिकेचे वाचन व सूत्रसंचालन सी.ई.ओ. संदीप जगताप यांनी केले, तर संचालक निलेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Spread the love