संघर्षावर मात करत संसाराचा गाडा समर्थपणे हाकणाऱ्या फलटणच्या दोन ‘नवदुर्गा’ सन्मानित; सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रेरणादायी उपक्रम!

मंगला जंगम व कमलाताई फडतरे यांच्या खडतर जीवन प्रवासाचा गौरव; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाला दिले नवे स्वरूप.

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑक्टोबर २०२६ ।

सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने नवरात्राचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या ‘नवदुर्गा’ या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत कौटुंबिक व सामाजिक जीवन जगत असताना अटीतटीचा संघर्ष करून संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या विशेष उपक्रमांतर्गत कोळकी (तालुका फलटण) येथील श्रीमती मंगला गणपत जंगम यांना ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर तीन मुली व एक मुलगा अशा मोठ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली होती. अशा अत्यंत हलाखीच्या व बिकट परिस्थितीत न डगमगता त्यांनी कुटुंबाची धुरा सांभाळली, आपल्या मुला-मुलींना उच्चशिक्षित केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून एक आदर्श निर्माण केला आहे.

याच उपक्रमांतर्गत फलटणच्या दुसऱ्या ‘नवदुर्गा’ म्हणून कोळकी येथीलच श्रीमती कमलाताई हरिभाऊ फडतरे यांचाही येथोचित सत्कार करण्यात आला. मुलांच्या व पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा वज्राघाताच्या प्रसंगीही न खचता आपल्या सुनांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आणि नातवांनाही सुसंस्कृत बनवले. इतकेच नव्हे तर, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सक्रीय कार्य करत असून विविध धार्मिक कार्यांमध्येही नेहमी सहभाग नोंदवतात.

कोळकी येथील या दोन्ही प्रेरणादायी ‘नवदुर्गांचा’ सत्कार सेवा भारतीचे सातारा जिल्हा सचिव हेमंत देशपांडे, सेवा भारतीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष शरदराव भरमगुंडे, गणित तज्ञ व प्राचार्य रवींद्र येवले, विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख पोपट बर्गे, विज्ञान प्रयोगशाळा निधी प्रमुख प्रशांत धनवडे, सेवा भारती विज्ञान प्रयोगशाळा सदस्या रेवती गोसावी आणि योगेश ढेकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या दोन्ही महिलांच्या संघर्षाची गाथा परिसरासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.

Spread the love