। लोकजागर वृत्त । फलटण । १४ नोव्हेंबर २०२६ ।
जगातील अत्यंत लांब आणि अंगावर काटा आणणारे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेला आणि थेट सैबेरियाहून आफ्रिकेला झेप घेणारा दुर्मिळ ‘अमूर फाल्कन’ (शास्त्रीय नाव – Falco amurensis) हा प्रवासी शिकारी पक्षी पहिल्यांदाच फलटण तालुक्यात आढळून आला आहे. फलटण तालुक्यात या दुर्मिळ पक्षाची झालेली ही पहिलीच नोंद असून, यामुळे सातारा जिल्ह्याच्या पक्षी निरीक्षणाच्या आणि वन्यजीव अभ्यासकाच्या इतिहासात एका अत्यंत सुवर्ण पानाची भर पडली आहे. नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी फलटणचे सदस्य तथा पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकार गणेश धुमाळ आणि रवींद्र लिपारे यांनी फलटण परिसरात हा पक्षी प्रत्यक्ष पाहिला असून त्याचे अचूक छायाचित्रण केले आहे. सुरुवातीला हा पक्षी सामान्य बाज वाटला होता, परंतु त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंग, शरीराची बांधणी, आकार आणि उडण्याच्या अनोख्या पद्धतीवरून हा अमूर फाल्कन असल्याचे सविस्तर तपासणीनंतर निष्पन्न झाले आहे.
सैबेरिया आणि उत्तर चीनच्या शीत प्रदेशात प्रजनन करणारा हा अत्यंत छोटा शिकारी पक्षी दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात अन्न व अनुकूल हवामानासाठी दक्षिण आफ्रिकेकडे तब्बल बावीस हजार किलोमीटरचा महाप्रवास करतो. या प्रचंड प्रवासात तो भारताच्या भूमीवरून मार्गक्रमण करतो. आतापर्यंत हा पक्षी प्रामुख्याने ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर आणि आसाम या राज्यांमध्ये मोठ्या थव्याने दिसून येत होता. विशेषतः नागालँडमधील दोयांग जलाशय परिसर हा जगभरात ‘फाल्कन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आता थेट पश्चिम महाराष्ट्रातील फलटणसारख्या दुष्काळी पट्ट्यात हा पक्षी आढळल्याने पक्षी तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या असून, त्याच्या पारंपरिक स्थलांतर मार्गाबद्दल आता नव्याने संशोधन करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. हवामान बदलामुळे स्थलांतर मार्गात झालेला बदल किंवा हा पक्षी आपल्या मुख्य थव्यापासून भरकटून फलटणच्या हद्दीत आल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. फलटण परिसरातील समृद्ध माळरान, जलसाठे आणि कीटकांची उपलब्धी यामुळे या पाहुण्या पक्षाला मुक्काम करण्यासाठी पोषक ठरली असावी.
अमूर फाल्कन या दुर्मिळ पक्षाचा आकार साधारणपणे २७ ते ३० सेंटीमीटर असून त्याचे वजन केवळ १२० ते १५० ग्रॅम दरम्यान असते. नर पक्षी एकदम गडद राखाडी-काळा असतो, त्याच्या पोटाखाली आणि शेपटीखाली केशरी-तांबूस रंग असतो तर पाय व चोचीजवळ केशरी रंग उठून दिसतो. मादी पक्षी थोडी फिकट असून तिच्या पोटावर ठिपके असतात. हा पक्षी प्रामुख्याने वाळवी, टोळ, भुंगे आणि मुंग्या यांसारखे पिकांचे नुकसान करणारे कीटक फस्त करतो, ज्यामुळे तो शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. हा पक्षी सैबेरियातून निघून भारतात येतो आणि तेथून अरबी समुद्रावरून सलग ५ ते ६ दिवस न थांबता तब्बल ३ हजार ते ६ हजार किलोमीटरचे समुद्रावरून अथांग विनाथांबा उड्डाण करत दक्षिण आफ्रिकेत पोहोचतो. समुद्रावरील या प्रवासात तो कुठेही विश्रांतीसाठी थांबत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आययूसीएनच्या (IUCN) यादीत हा ‘लिस्ट कन्सर्न’ श्रेणीत असला, तरी भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार तो अनुसूची-१ मध्ये अत्यंत संरक्षित आहे, त्यामुळे याची शिकार करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो.
या अभूतपूर्व आणि दुर्मिळ नोंदीमुळे फलटण तालुका आता थेट राज्याच्या आणि देशाच्या पक्षी नकाशावर ठळकपणे झळकला आहे. या ऐतिहासिक नोंदीनंतर स्थानिक प्रशासन, वनविभाग आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत या दुर्मिळ पाहुण्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी आता वन्यजीवप्रेमींमधून होत आहे.
