मंजूर ९९ घरकुल लाभार्थ्यांना ३५ लक्ष रुपयांच्या अनुदानाचे वाटप; योजनेच्या माहितीसाठी नगरपरिषद कक्षाशी संपर्क साधण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश.
। लोकजागर । फलटण । १६ एप्रिल २०२६ ।
फलटण शहरातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ गतीने राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत फलटण नगरपरिषदेला आतापर्यंत २१० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९९ घरकुलांना भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, या मंजूर घरकुल लाभधारकांना पहिल्या टप्प्यातील एकूण ३५ लक्ष रुपयांच्या अनुदानाचे वाटपही करण्यात आले आहे.
शासनाकडून फलटण शहरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शहराचा विस्तार आणि गरज पाहता, जास्तीत जास्त पात्र व इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले हक्काचे घर साकार करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
लाभार्थी नेतृत्व बांधकाम (BLC) या घटकांतर्गत स्वतःची जागा असणाऱ्या नागरिकांना घर बांधण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या अटी, शर्ती आणि अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीकरिता नागरिकांनी फलटण नगरपरिषदेमधील ‘प्रधानमंत्री आवास योजना’ कक्षाला प्रत्यक्ष भेट द्यावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला निवारा मिळवून देण्यासाठी हे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक असून, नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.
