गणेश विसर्जन सोहळ्यासाठी फलटण नगरपरिषद सज्ज

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना जाहीर; विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । २४ सप्टेंबर २०२६ ।

फलटण शहरामध्ये १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सुरू आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशी शहरातील लहान-मोठी मंडळे गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या उत्साहात करत असतात. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या वतीने सांस्कृतिक भवन व यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच फलटण शहरातील जे नागरिक गणेशमूर्ती दान करणार आहेत, त्यांच्या सोयीसाठी पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजानन चौक आणि उंब्रेश्वर चौक या ठिकाणी गणेशमूर्ती संकलन वाहने तैनात ठेवण्यात येणार आहेत. शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून विसर्जन मार्गावर तसेच विसर्जन ठिकाणी आवश्यक स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंढरपूर पूल, बारामती पूल आणि शेती शाळा या ठिकाणी आवश्यक क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विसर्जन ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक लाईफ गार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत. फलटण शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी आपली गणेशमूर्ती नगरपरिषदेकडील उपलब्ध क्रेनमध्ये ठेवून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

Spread the love