फलटण नगर परिषद शाळांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार; माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम; क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय सहविचार सभेमध्ये घेण्यात आला आहे.

। लोकजागर । फलटण । १६ एप्रिल २०२६ ।

फलटण नगर परिषद शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी दिली. फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी बोलताना सौ. प्रियदर्शनी भोसले म्हणाल्या की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या शाळांना सर्व भौतिक सुख-सुविधा पुरवल्या जातील आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील.

या सभेमध्ये नवीन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच विविध उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करणे, शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व खासगी व प्राथमिक शाळांच्या भव्य मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तसेच नगर परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित भव्य वार्षिक स्नेहसंमेलन भरवण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आदर्श शाळांना भेटी, शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार व प्रेरणादायी व्याख्याने आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

या सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नगर परिषद शाळा क्रमांक ८ चे मुख्याध्यापक दीपक पवार यांनी केले.

Spread the love