कडाक्याच्या उन्हात महिलांना मोठा दिलासा; ८०० हून अधिक महिलांनी घेतला स्मार्ट कार्ड कॅम्पचा लाभ

नगरसेविका सिद्धाली शहा व माऊली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; लांबच लांब रांगांतून ज्येष्ठ नागरिक व महिलांची सुटका.

। लोकजागर । फलटण । २१ एप्रिल २०२६ ।

उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि एसटी बसच्या स्मार्ट कार्डसाठी आगारांमध्ये लागणाऱ्या लांबच लांब रांगा लक्षात घेऊन, फलटणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्मार्ट कार्ड कॅम्पला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माऊली फाउंडेशन आणि सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या कुमारी सिद्धाली अनुप शहा यांच्या संयुक्त विद्यमाने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ८०० महिलांना अत्यंत सुलभरीत्या स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती सिद्धाली शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

वाढत्या उन्हामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस स्थानकावर तासनतास उभे राहणे कठीण होत होते. ही अडचण ओळखून सिद्धाली शहा यांनी आपल्या संपर्क कार्यालयातच या सुविधेचे आयोजन केले. यामुळे वॉर्डातील आणि शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रक्रियेचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे अत्यंत जलद आणि सुरळीतपणे कार्ड वाटप पार पडले. अल्पावधीत इतक्या मोठ्या संख्येने महिलांना ही सुविधा मिळाल्याने आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि प्रवासातील सवलतींचा विचार करून हा उपक्रम राबवल्याबद्दल सिद्धाली शहा यांच्या संवेदनशीलतेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी माऊली फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love