‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ पुरस्कारांची घोषणा; विनोद कुलकर्णींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

। लोकजागर वृत्त । सातारा । १० ऑगस्ट २०२६ ।

स्वातंत्र्य संग्रामात देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला आणि देशप्रेमाला मानवंदना देत, त्यांच्या कार्याचा वारसा आपल्या कर्तृत्वातून पुढे नेणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ अर्थात ‘उदाहरण आदर्श देशप्रेमाचे’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार व लेखक विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यासह कुस्ती, माजी सैनिक, वकिली, शिक्षण, आडत व्यवसाय, सामाजिक, सार्वजनिक तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. ‘मिसाल वतन से मुहब्बत की’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून स्वातंत्र्यवीरांचा त्याग, संघर्ष, देशप्रेम, समाजसेवा आणि माणुसकीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रेरणादायी उपक्रम आहे. सन २०२५ पासून सातारा शहरातून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

साताऱ्यातील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या व चिरनिद्रेत विसावलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना अभिवादन करताना, त्यांनी ज्या-ज्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले, त्याच क्षेत्रातील मूल्ये, निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची परंपरा पुढे नेणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्यवीरांनी देश गौरवासाठी विविध क्षेत्रात केलेल्या समाजकार्यानुसार पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यसैनिक इम्तियाज मिर्झा मास्तर यांच्या लेखक, कवी व शायरी क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार व लेखक विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता, लेखन, कला, क्रीडा, साहित्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरात आयोजित करून साताऱ्याचा नावलौकिक वाढवला आहे. स्वातंत्र्यसैनिक पैलवान उमर बाळाभाई खाटिक यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांचा गौरव करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम फरास यांच्या माजी सैनिक म्हणून केलेल्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी सैनिक शंकर माळवदे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यसैनिक इस्माईल साहेब मुल्ला यांच्या वकिली क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ मनीषाताई बर्गे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक महिताप शेख मास्तर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध पारितोषिके व सन्मान प्राप्त केलेले शिक्षक जावेद अर्शद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यसैनिक अब्दुल जब्बार हकीम यांच्या आडत विभागातील उल्लेखनीय कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवीण कांबळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक शेख काका इनामदार यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ माहेश्वरीचे माधव सारडा यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यसैनिक शफी शेख यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवक वसंतशेठ जोशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यसैनिक इस्माईल हकीम यांच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बागवान जमीयतच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे परवेज बागवान यांना तसेच भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैद्यकीय क्षेत्रात जनसेवा केल्याबद्दल कौशिक पाटील यांना ‘मिसाल वतन से मुहब्बत की – २०२६’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या या सोहळ्याला सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खिदमत-ए-खल्क व जमीयतुल उलमा वल हुफ्फाज, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love