शिंगणापूर चौकातील रिक्षा स्टॉपजवळील घटना; पाऊस आणि मेघगर्जनेमुळे नागरिकांची उडाली धांदल.
। लोकजागर । फलटण । १३ मे २०२६ ।
फलटण शहर आणि परिसरात आज सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसादरम्यान कोळकी (ता. फलटण) येथे वीज पडल्याची धक्कादायक घटना घडली. शिंगणापूर चौका नजीक असलेल्या रिक्षा स्टॉपजवळ एका नारळाच्या झाडावर ही वीज कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, वीज पडली त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
वीज पडल्यानंतर संबंधित नारळाच्या झाडाला काही प्रमाणात आग लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने माजी फलटण पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी फलटण नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करून कोळकी ग्रामपंचायत कर्मचार्यांना योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले. सुदैवाने आगीचे स्वरूप फारसे मोठे नसल्यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आली होती. भरवस्तीत आणि रिक्षा स्टॉपसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पावसाळा पूर्व पावसाच्या या जोरदार आगमनाने आणि विजेच्या कडकडाटाने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाचे नुकसान झाले असले तरी, कोणालाही इजा न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. प्रशासनाने नागरिकांना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.
