प्रचंड उकाड्यानंतर फलटणकरांना दिलासा; मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी

सायंकाळच्या सुमारास पावसाचे आगमन; हवेत निर्माण झाला गारवा.

। लोकजागर । फलटण । १३ मे २०२६ ।

गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या फलटणकरांना आज अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. आज सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह पावसाला जोरदार सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाहीलाही होत असल्याने नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. या पावसाच्या आगमनामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना या पावसामुळे सुखद धक्का बसला. संध्याकाळी झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले असून, सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे उष्णतेचा जोर ओसरला असला, तरी मेघगर्जनेसह आलेल्या या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मान्सूनपूर्व सरींच्या या आगमनाने बळीराजासह सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फलटण शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणीही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त असून यामुळे शेतीकामांनाही वेग येण्याची शक्यता आहे.

Spread the love