फलटण तालुक्यात २० मे रोजी औषध दुकाने राहणार बंद; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्षांना केमिस्ट बांधवांचे निवेदन

शांततेत आंदोलन पार पाडण्याचे प्रशासनाचे आवाहन.

। लोकजागर । फलटण । १६ मे २०२६ ।

ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलतींच्या निषेधार्थ ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ संघटनेने येत्या बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या लाक्षणिक आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि मागण्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने राजकीय नेतृत्व तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना संघटनेच्या वतीने अधिकृत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह धुमाळ आणि उपाध्यक्ष रणजीत कदम यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींशी झालेल्या या चर्चेदरम्यान औषध विक्रेत्यांसमोर उभ्या असलेल्या विविध अडचणी आणि ऑनलाईन औषध विक्रीमुळे निर्माण होणारे प्रश्न मांडण्यात आले.

राजकीय नेत्यांशिवाय प्रशासकीय पातळीवरही हालचाली गतिमान झाल्या असून, असोसिएशनच्या वतीने फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव, प्रांताधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक, तसेच शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना बंदबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. औषध व्यवसायातील वाढत्या समस्या आणि संघटनेची भूमिका यावर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने हा विषय अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतला असून, कायद्याच्या चौकटीत राहून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे लाक्षणिक आंदोलन पार पाडावे, असे आवाहन केमिस्ट बांधवांना केले आहे.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आलेल्या या बंदच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बंद करणे, २८ ऑगस्ट २०१८ चा संबंधित निर्णय मागे घेणे, कॉर्पोरेट क्षेत्राकडून दिला जाणारा अव्यवसायिक सवलतींचा म्हणजेच डिस्काउंटचा खेळ थांबवणे आणि बनावट औषधांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी २६ मार्च २०२० रोजीचा शासन निर्णय रद्द करणे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा सातारा जिल्हा अध्यक्ष सागर पाटील आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशनचे सदस्य राहुल मोहिते यांनी यापूर्वीच दिला आहे.

दरम्यान, या एक दिवसाच्या बंदमुळे तालुक्यातील औषध पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने रुग्णांनी आपल्या आवश्यक औषधांचा साठा आधीच करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी, नागरिकांची आणि रुग्णांची अतितातडीच्या प्रसंगी गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर विशेष काळजी घेण्यात आली असून, दोन प्रमुख ठिकाणी अत्यावश्यक औषध पुरवठा सेवा सुरू ठेवली जाणार आहे. तालुक्यातील सर्व औषध विक्रेता सभासदांनी या आंदोलनात एकजूट आणि शिस्त कायम राखून सहकार्य करावे, असे आवाहन फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केले आहे.

Spread the love