अजित जाधव यांना पुणे येथे ‘महात्मा फुले गौरव पुरस्कार’ प्रदान

सावित्रीबाई सेवा फाउंडेशनचा उपक्रम; सामाजिक आणि विचार प्रसाराच्या कार्याची दखल.

। लोकजागर । फलटण । १६ मे २०२६ ।

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून, समाजामध्ये विशेष उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी सावित्रीबाई सेवा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने समाज गौरव व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी फलटणचे ‘महात्मा फुले विचार अभियान’ संयोजक अजित जाधव यांच्या समाज व देशहिताच्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानाच्या ‘महात्मा फुले गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांना मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे ‘महात्मा’ पदवी अर्पण केल्याच्या १३८ व्या संस्मरणीय दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. महात्मा फुले यांनी नाना पेठ, पुणे येथे सुरू केलेल्या शाळेच्या क्रांती भूमी परिसराजवळील अहिल्याश्रम येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. डी. सी. एम. सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते अजित जाधव यांना स्मृतिचिन्ह, शाल, संविधानाची प्रत आणि महात्मा फुलेंची पुस्तिका देऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी स्वयंसिद्ध राखी रासकर, नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रा. किशोर चौरे आणि सामाजिक कार्यकर्ते धर्मप्रकाश शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अजित जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कार्य केले असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विधायक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांत अविरत योगदान दिले आहे. ‘महात्मा फुले विचार अभियान’ या विशेष उपक्रमांतर्गत त्यांनी फुले दांपत्याच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. तसेच, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पाऊलखुणा ज्या ऐतिहासिक ठिकाणी उमटल्या, त्या क्रांतीकार्याला उजाळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले. यासोबतच फुले प्रेमींना प्रतिमांचे वितरण करणे आणि फुले दांपत्याच्या विचारांवर कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

या सोहळ्यासाठी सावित्रीबाई सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष लातंत प्रसून, सचिव हेमा मस्के, लेखिका रश्मी दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे आणि वृषभ मस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्त्या भारती अंकेलू यांनी केले, तर कार्यक्रम संयोजक प्रशांत फुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. अजित जाधव यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल फलटणमधील सामाजिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love