फलटणमध्ये गजानन चौकातील ५० वर्षे जुन्या झाडांवरून ‘हाय व्होल्टेज ड्रामा’; मुख्याधिकारी व पर्यावरणप्रेमींमध्ये शाब्दिक चकमक

भाजप नगरसेवक संदीप चोरमले आणि दादासाहेब चोरमले यांच्यात राजकीय जुंपली; नेचर अँड वाईल्डलाईफ सोसायटीचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन.

। लोकजागर । फलटण । २१ मे २०२६ ।

सध्या फलटण शहरात अंतर्गत पालखी मार्गाच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम अत्यंत जोमात सुरू आहे. मात्र, या मार्गावरील गजानन चौक ते महात्मा फुले चौक या दरम्यान असलेल्या सुमारे ५० वर्षांहून अधिक जुन्या आणि डेरेदार वृक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. गजानन चौक येथील या ऐतिहासिक झाडांच्या पाहणीसाठी मुख्याधिकारी निखिल जाधव व नगरपरिषदेचे प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी आले असता, तेथे उपस्थित निसर्गप्रेमी, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसोबत त्यांची जोरदार ‘तू-तू-मै-मै’ झाली. या वाढत्या वादामुळे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे फलटणमधील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

मुख्याधिकारी पाहणी करत असतानाच, तेथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले, निलेश तेलखडे आणि मंगेश खंदारे यांच्यासह उपस्थितांनी प्रशासनाला झाड तोडण्यापासून तीव्र शब्दात विरोध केला. यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी, “आम्ही येथे फक्त कामाची पाहणी करायला आलो आहोत, झाड काढायला आलेलो नाही,” अशा कडक शब्दात उपस्थितांना सुनावले व तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर शहरात वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय ठिणगी पडली.

पूर्वीच्या ठरावावरून संघर्ष: या सर्व घडामोडींवर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप चोरमले यांनी उडी घेत थेट हल्लाबोल केला. गजानन चौक परिसरातील झाडे काढण्याबाबतचा ठराव नगरपरिषदेत यापूर्वीच मंजूर झाला असल्याचा दाखला त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या ठरावाला माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले याच ‘सूचक’ होत्या, हे निदर्शनास आणून देत संदीप चोरमले यांनी विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. संदीप चोरमले यांच्या या टिकेला दादासाहेब चोरमले यांनी चोख प्रतिउत्तर दिले. नगरपरिषदेच्या पाच वर्षांपूर्वीच्या ठरावात केवळ ‘जीर्ण आणि धोकादायक’ झाडे काढण्याची नोंद होती, असे स्पष्ट करत सध्या गजानन चौकातील झाडे पूर्णपणे निरोगी व सुरक्षित आहेत; त्यामुळे ही निरोगी झाडे तोडण्यास आपला ठाम विरोधच राहील, असे दादासाहेब चोरमले यांनी ठणकावून सांगितले.

नेचर अँड वाईल्डलाईफ सोसायटीचे प्रांताधिकार्‍यांना साकडे: एकीकडे या मुद्द्याला राजकीय रंग मिळत असताना, दुसरीकडे ‘नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, फलटण’ या निसर्ग व प्राणीप्रेमी संघटनेने थेट प्रशासकीय पातळीवर धाव घेतली आहे. संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांना एक सविस्तर निवेदन देऊन ही झाडे वाचवण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या वृक्षांनी अनेक दशकांपासून नागरिकांना सावली, शुद्ध हवा आणि नैसर्गिक थंडावा दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या डेरेदार वृक्षांवर पक्ष्यांची शेकडो घरटी असून येथे दुर्मिळ पक्षी वास्तव्यास आहेत. जर ही वृक्षतोड झाली, तर स्थानिक जैवविविधतेवर त्याचे गंभीर आणि हानिकारक परिणाम होतील, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

संस्थेच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याचा विकास करताना वृक्षतोड टाळून पर्यावरणपूरक पर्याय शोधावेत आणि रस्त्यांचे काम करताना वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. शहरातील अनेक पर्यावरणप्रेमी सुज्ञ नागरिकांनीही या वृक्ष संरक्षणाच्या मोहिमेला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. आता प्रशासन विकासकामांचा वेग कायम राखत या मुक्या पक्ष्यांचे आणि ऐतिहासिक वृक्षांचे प्राण कसे वाचवते, याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

Spread the love