|लोकजागर | विशेष लेख |
प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि त्यानंतर इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य महापुरुष यावर आपल्या अमोघ वाणीने ज्यांनी 1960 ते 2011 पर्यंत 51 वर्षे महाराष्ट्र, देश, परदेशमधील श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले अशा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची जन्मशताब्दि 15 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. वक्तृत्त्व व त्यातून समाज प्रबोधन, संस्कार व नीतीमूल्ये हीच त्यांनी आयुष्यभर आपली जीवनसाधना मानली. अशा शब्दप्रभू प्राचार्यांना जन्मशताब्दि वर्षानिमित्त ही भावपूर्ण शब्दांजली….
– रविंद्र बेडकिहाळ, फलटण.
कायम दुष्काळी तालुका अशी ज्या खटाव जि.सातारा तालुक्याची ख्याती होती त्यातील कलेढोण या लहानशा खेड्यात प्राचार्यांचा जन्म 15 जुलै 1926 रोजी झाला. बालवयापासून आई अनुसूया, प्राथमिक शिक्षक असलेले वडिल अनंतराव भोसले यांच्या संस्कारक्षम, पण कडक शिस्तीखाली शिवाजीराव मोठे होत होते. प्राथमिक शिक्षण कलेढोण, माध्यमिक शिक्षण विटा व महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे झाले. पुढे त्यांचे बंधू व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.बाबासाहेब भोसले हे मोठे वकील असल्यामुळे शिवाजीरावही सुरूवातीला आकर्षण म्हणून पुण्यात वकीलीच्या शिक्षणासाठी आले. वकील झाले. काही काळ सातारला बॅ.बाबासाहेब भोसले यांचे हाताखाली त्यांनी वकिलीला सुरूवात केली. पण पुढे आलेल्या अनेक खटल्यात खर्याचे खोटे, खोट्याचे खरे, संशयित आरोपी गुन्हेगार असला तरी तो गुन्हेगार नाही यासाठी त्यांची वकिली करणे शिवाजीरावांच्या सरळ बुद्धीला पटले नाही. हे आपले क्षेत्र नाही, म्हणून त्यांनी तिथून माघार घेतली. सातार्यात महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा व शिका’ या योजनेतून घेतले होते. त्यामुळे कर्मवीरांचे विचार कार्य व तत्त्वज्ञान यांचे त्यांना जवळून दर्शन झाले. शिक्षण हेच आपले ध्येय क्षेत्र व्हावे या उद्देशाने ते कर्मवीरांना भेटले. त्यावेळी सातारमध्ये तशी संधी नव्हती. पण कर्मवीरांनी त्यांना थोडा धीर धर असे सांगितले.
फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातून सुरूवात ः
योगायोग असा की, फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या फलटण एज्युकेशन सोसायटी या संस्थानकालीन शिक्षण संस्थेतर्फे मुधोजी महाविद्यालय सुरू करण्याचे निश्चित केले होते. या महाविद्यालयाची सुरूवात त्यांनी आपल्या मुधोजी मनमोहन राजवाड्यातून केली. त्याचे उद्घाटन दिनांक 23 जून 1957 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते झाले. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व बॅ. पी. जी. पाटील उपस्थित होते. समारंभ अर्थातच राजेशाही थाटात झाला. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एका पोरसवदा तरुणाला मालोजीराजेंना भेटवले व सांगितले की, हा माझ्या संस्थेच्या बोर्डिंगचा विद्यार्थी शिवाजी भोसले. माझ्या वटवृक्षाची ही एक फांदी मी तुम्हाला देतोय. तो तुमच्या महाविद्यालयाचे नाव काढेल. मालोजीराजेंनी ते मान्य केले आणि शिवाजीराव भोसले तिथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले. नंतर प्राध्यापक, वसतीगृह अधीक्षक, उपप्राचार्य व 1963 पासून प्राचार्य झाले. तेव्हापासून त्यांनी फलटण हीच आपली कर्मभूमी मानली. ते तर्कशास्त्र, मानसशास्त्र व तत्त्वज्ञान शिकवायचे. त्यातूनच त्यांचे वाचन, चिंतन, मनन सुरू झाले. प्रसिद्ध तत्त्वज्ञानी जे.कृष्णमूर्ती, योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांच्या वक्तृत्त्व व विचार यात्रेतील तीर्थक्षेत्रे होती. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानात या आदर्शांच्या विचारांची प्रतिके तरुण श्रोत्यांना पर्वणीच असायची. कारण त्यांच्या व्याख्यानात तरुण पिढी घडविण्याचे, समाज मनाचे भान जागृत ठेवण्याचे सामर्थ्य असायचे. ते कोठेही व्याख्यानाला गेले की त्यांचा परिचय करुन देणारा निवेदक जेव्हा ‘फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य’ असे म्हणायचा तेव्हा हा गौरव, कर्मवीरांनी मालोजीराजेंना जे सांगितले होते की, हा तरुण तुमच्या महाविद्यालयाचे नाव मोठे करेल या आश्वासनाचा आहे, याचे मनोमन भान शिवाजीरावांना नेहमीच असायचे.
व्याख्यानातून समाज मन घडविण्याचे सामर्थ्य ः
शिवाजीराव जेव्हा फलटणला प्राध्यापक म्हणून रूजू झाले तेव्हाच त्यांच्या वाणीत वक्तृत्त्वाची बीजे रूजली होती. म्हणजे तेव्हापासूनच त्यांना वक्ता म्हणून बोलवायला सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्था, गणेश मंडळे, व्याख्यानमाला यांच्याकडून सुरूवात झाली. पुढे त्याचा विस्तार अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील ज्या राज्यात बृहन्महाराष्ट्र मंडळे किंवा मराठी भाषेची अभ्यास केंद्रे असत तिथपर्यंत झाला. नवी दिल्ली, इंदौर, बडोदा, गुलबर्गा, हैद्राबाद, बंगलोर, गोवा, इत्यादीपर्यंत आणि नंतर अमेरिका, लंडन येथेही झाला.
‘कमवा व शिका’ या योजनेतून स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व आणि स्वामी विवेकानंद, जे.कृष्णमूर्ती, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद यांच्या चरित्रांचा अभ्यास यातून त्यांना हे सर्व विचार व्याख्यानातून नव्या पिढीला देण्याची प्रेरणा मिळाली. याशिवाय छत्रपती शिवराय, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना घडविणार्या राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकराजा राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बॅ.विनायक दामोदर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, गुरूदेव रानडे, रमण महर्षि, आचार्य विनोबा भावे, ज्ञानेश्वर, तुकारामांसह अनेक संत, अनेक प्रसिद्ध साहित्यिक अशा अनेक महापुरुषांवरील व्याख्यानातून तरुण श्रोतृवर्गाला एक नवे चैतन्य मिळायचे. बीड जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी डॉ.सुरेश नवले हे त्यांचे विद्यार्थी. नवले यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ त्यांनी ‘आई’ या विषयावर सरांची महिनाभर व्याख्यानमाला ठेवली. सरही विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव व ‘आई’ची महती पुन्हा एकदा जगाला कळावी यासाठी तिथे गेले. अक्षरशः सरांच्या व्याख्यानाला उपस्थित हजारो श्रोत्यांचे आणि बहुसंख्येने उपस्थित महिलांचे डोळे महिनाभर पाझरत होते.पुण्यामधील ऐतिहासिक वसंत व्याख्यानमालेत तर कहरच झाला. या व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे दरवर्षी 2 याप्रमाणे एकूण 56 व्याख्याने देण्याचा त्यांनी विक्रम केला होता. ज्या दिवशी सरांचे व्याख्यान टिळक स्मारक मंदीरातील वसंत व्याख्यानमालेत असे त्या दिवसाची तिकीटे कधीकधी आधीच ब्लॅकने विकली जायची आणि व्याख्यानाच्या आधी व नंतर टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असायचा. वसंत व्याख्यानमालेतील तोपर्यंतच्या एकाही वक्त्याच्या व्याख्यानावेळी असे कधी घडले नाही. पुणेकरांनी सरांना कायमच डोक्यावर घेतले होते.
व्याख्यानाची खास वैशिष्ट्ये ः
सरांनी कायम आपल्या व्याख्यानातून संयम आणि विवेकाचा जागर केला. त्यांच्या भाषणात शब्दांची पुनरावृत्ती नव्हती. पण रसाळ, मधाळ, एकटाकी शब्दफेक सुसंगत असायची. पांढरी पँट, त्यावर पांढरा शर्ट (मॅनिला) खोचलेला, त्यावर काळा कोट हीच त्यांची कोणत्याही व्याख्यानाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला कायम पोषाख व्यवस्था, अगदी महाविद्यालयात शिकवितानाही ठरलेली असायची. कधीही त्यात बदल नसायचा. सरांची बोलण्याची ढबही कायम असायची. कसलेही हातवारे नाही. आवाजाची चढउतार नाही. बोलण्यात आक्रमकता नाही. शांत, संथ अशा एकाच लयीत शिवाजीराव बोलायचे. शब्दांची पखरण करताना एखाद् दुसरा नर्म विनोद, तत्कालीन परिस्थितीला अनुसरुन काही चिमटे, शाल जोडीतून शेलकी भलावण हे त्यांच्या वक्तृत्त्वाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यात छत्री हमखास. प्रस्तुत लेखक फलटणला त्यांच्या सहवासात सन 1970 पासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 29 जून 2010 पर्यंत होते. एवढ्या वर्षात कधीही त्यांच्या पोषाखाच्या ट्रेडमार्कमध्ये बदल झाला नाही. तत्कालिन राजकारण, वाद यापासून ते नेहमीच अलिप्त असायचे. तसेच काही ‘इझम’ पासूनही. गांधीवाद, आंबेडकर वाद, टिळक आगरकर वाद, सावरकर वाद, तर साहित्यातील अत्रे फडके वाद, अशा सर्व क्षेत्रातील ‘इझम’ पासून ते अलिप्त असायचे. याबाबत काहीजण म्हणायचे, ज्यांना सावरकर आवडतात त्यांना गांधी आवडू नयेत. जे टिळकांना मानतात, त्यांनी आगरकर विसरावेत. ज्यांना फुले, आंबेडकर, शाहू प्रिय असतील त्यांनी विवेकानंद, रामकृष्ण यांचे नाव सुद्धा घेऊ नये. जे बुद्धीनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ असतील त्यांच्या मनाला भावनांचे पाझर फुटू नयेत, अशी परस्पर विसंगती असायची. पण त्यावर सर फार मार्मिक बोलायचे. ते म्हणायचे, ‘‘एखाद्या सुंदर बागेमध्ये अनेक रंगीबेरंगी फुलांची झाडे असतात. वेली असतात. जंगलातही अनेकविध उंच वृक्ष असतात. मग हे प्रकार, आकार पाहून आपण भांबावून कशाला जायचे ? या आनंदायी निसर्गाचे विश्वरूप दर्शन आपण कां टाळायचे ? वाद बाजूला ठेवावे, आणि या महापुरुषांच्या चरित्रातील चारित्र्याचे, आदर्शाचे दर्शन आपण समाजाला दाखवावे. यात चूक काय ?’’ ‘आपुला तो एक देव करूनि घ्यावा’ ह्या संत वचनाप्रमाणे सरांनी ‘वक्तृत्त्व’ हाच आपला धर्म आणि देव मानला होता.
तेच त्यांच्या लेखनाचे. वर्गात आणि अनेक ठिकाणी शिकवणे, वक्तृत्त्व यातून सरांना तसा लिहिण्यासाठी फार कमी वेळ मिळाला. तरीही त्यांनी पुढील पिढीला उपयुक्त असेच लेखन वृत्तपत्रातील स्तंभातून, ग्रंथामधून केले. ‘सकाळ’ मधली त्यांची ‘दीपस्तंभ’ ही लेखन मालिका चिरस्मरणीय झाली. त्याचे पुस्तक दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर, कथा वृत्तपत्रांची, हितगोष्टी या त्यांच्या ग्रंथांनी मराठी साहित्यातील चरित्राचे आणि वैचारिक ग्रंथांचे दालन समृद्ध केले.
सरांचे बंधू बॅ.बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना कधीही त्यांनी त्यांच्या पदाचा लाभ घेतला नाही. कोणालाही सांगितलेले नसतानासुद्धा त्यांना या काळात महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला होता. पण निर्लेप मनाने सर हा पुरस्कार घ्यायला गेले नाहीत. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना आपल्या प्रचार सभांना एकदा तरी या असा आग्रह धरला होता. पण सरांनी या सर्वांना अंतरावरच ठेवले होते. सन 1988 ते 1991 पर्यंत ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते. संघर्षाच्या काळात त्यांनी सलग 3 वर्षे तारेवरची कसरत असूनसुद्धा यशस्वीपणे आपला कार्यकाळ पूर्ण केला. एवढाच काय तो शासन पातळीवरचा सन्मान सोडला तर महाराष्ट्र शासनाकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. राज्यातला सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार किंवा मराठी भाषा विभागातला मराठी भाषेचा सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा होता. तसेच केंद्र शासनाच्या ‘पद्म’ पुरस्कारापैकी एखादा पुरस्कार त्यांना मिळायला हवा होता. सर पुरस्कार मागण्यातले नव्हते तर समाजाला प्रगल्भ विचार, संस्कार, नीतीमूल्ये, विवेकाचा जागर देणारे होते.
पण झाले ते झाले. आता त्यांची जन्मशताब्दि 15 जुलै पासून सुरू होणार आहे. त्यांचे वक्तृत्त्वातील परमशिष्य व सध्याच्या पिढीचे आवडते वक्ते प्रा.मिलींद जोशी यांच्या पुढाकाराने वर्षभर ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दि समिती’च्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘विवेकाचा विचार जागर’ महाराष्ट्रभर सुरू राहील. डॉ.पतंगराव कदम यांनी त्यांच्या भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयातर्फे त्यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार दिला होता. सरांच्या आयुष्यातला हा शेवटचाच पुरस्कार होता. कारण 29 जून 2010 रोजी सरांचे निधन झाले. आज या शताब्दिवेळी डॉ.पतंगराव कदम असते तर त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्त्व विद्यापीठच काढले असते व सरांना तहहयात या वक्तृत्त्व विद्यापीठाचे कुलगुरु केले असते.
या जरतरच्या गोष्टी सोडल्या तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सरांचे स्मारक (पुतळा वगैरे नाही) विवेक, विचारांचा जागर करणारे, नव्या पिढीला पुन्हा एकदा संस्काराची शिकवण देणारे, सध्या समाजात जी एक प्रकारची अस्वस्थता आली आहे त्यासाठी तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आणि नवोदित वक्त्यांना काही संस्कार देणारे, सामाजिक भान व समूह संवाद वाढविण्यासाठी परस्पर सहिष्णुतेचे असे अनेक कार्यक्रम राबविले तरच ही जन्मशताब्दि निमित्ताने सुयोग्य आदरांजली व स्मृतीस्मरण ठरेल एवढीच अपेक्षा.
