जपानच्या एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिपमध्ये सातारचे सुपुत्र विश्‍वजित भोसले यांना रौप्यपदक

वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार; फलटणमध्ये सत्कार संपन्न

। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑगस्ट २०२६ ।

ड्रॅगन बोट हा वॉटर स्पोर्ट्स प्रकारातील खेळ आहे. कायाकिंग हा त्यातील एक इव्हेंट आहे. मी २०१९ पासून या खेळाचा सराव करत आहे. स्टेट लेव्हलपासून नॅशनल, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, खेलो इंडिया स्पर्धा आणि आता एशियन चॅम्पियनशिपपर्यंतचा मी प्रवास केला आहे. या पदकावर न थांबता आगामी काळात वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊन त्यात पदक जिंकण्याचा मानस आहे,” अशी महत्त्वाकांक्षा एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिपमध्ये भारताला यश मिळवून देणारे खेळाडू विश्‍वजित भोसले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या विश्‍वजित भोसले यांनी जपानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रौप्यपदक पटकावत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम येथील रहिवासी आहेत. देशाचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूशी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी फलटण येथे विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

विश्‍वजित भोसले पुढे म्हणाले, “हे पदक मिळवण्यामागे माझे हितचिंतक आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मोठे योगदान आहे. हा खेळ मला यूट्यूबवरून समजला. सुरुवातीला कुतूहल होते; मात्र या खेळाबाबत फारसे ज्ञान नव्हते. त्यानंतर रिसर्च करून माहिती घेतली आणि सरावाला सुरुवात केली. धोम धरणातून माझ्या सरावाची सुरुवात झाली. वडिलांचा मला १०० टक्के पाठिंबा होता. मात्र काही तांत्रिक बाबींच्या कमतरतेमुळे मी पुढे पुण्यातील पिंपरी-चिंचवड वॉटर क्लबमध्ये प्रवेश घेतला. तेथील मार्गदर्शकांच्या पाठिंब्यामुळे मला या खेळाचे पूर्ण ज्ञान मिळाले.”

“या खेळामुळे शारीरिक विकासासोबतच मानसिक स्थैर्यही निर्माण होते. कोणतेही काम करताना एकाग्रतेने काम करण्याची शिकवण या खेळातून मिळते. सातारा जिल्ह्यात या खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित झाल्या पाहिजेत. राष्ट्रीय स्पर्धांपूर्वीच्या विविध स्पर्धांचे आयोजन आपल्या जिल्ह्यात झाले पाहिजे. सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना या खेळासाठी प्रोत्साहित करायचे आहे. हा खेळ अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचवून त्याची प्रसिद्धी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी या खेळासंबधी एखादी जिल्हास्तरीय संघटना सुरू करण्याचा आपला विचार आहे,” असेही विश्‍वजित भोसले यांनी सांगितले.

श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाच्यावतीने विशेष सन्मान

दरम्यान, या दैदिप्यमान कामगिरीबद्दल विश्‍वजित भोसले यांचा श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. फलटण येथील महाराजा आयकॉन येथे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न झाला.

यावेळी महाराजा व सद्गुरु उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, संचालक हेमंत फुले, दिपराज तावरे, तुषारभाई गांधी, कुमार भट्टड, विलास रसाळ, अमोल सस्ते, मानाजीराव चव्हाण, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप, विश्‍वजित भोसले यांचे पिताश्री अजितकाका भोसले, डॉ. विक्रांत रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love