पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर जीवघेणी कसरत

महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांच्याकडून गौरव व मदत; बालहक्क व शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

। लोकजागर वृत्त । फलटण । १३ ऑगस्ट २०२६ ।

उदरनिर्वाहासाठी परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबातील मोठी माणसे हॉटेल, लॉज, बांधकाम, वीटभट्टी किंवा मिळेल ते काम करून संसाराचा गाडा ओढताना दिसतात. मात्र, आता अशा कुटुंबांतील चिमुकली मुले-मुलीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर कसरतीचे प्रयोग सादर करून पैसे मिळवताना दिसत आहेत. फलटण शहरातील गजानन चौकात एका चिमुकल्या मुलीने बांबूच्या साह्याने उंचावर बांधलेल्या बारीक दोरीवर तोल सांभाळत केलेली जीवघेणी कसरत पाहून नागरिकांचे मन हेलावून गेले.

छत्तीसगडमधून कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात आलेले हे कुटुंब सध्या दहिवडी (ता. माण) येथे मुक्कामी आहे. कुटुंबातील मोठी माणसे मिळेल ती कामे करतात, तर लहान मुले-मुली मोठ्या भावंडांसोबत शहरांच्या रस्त्यावर कसरतीचे खेळ सादर करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत. अर्जुन व करण प्रसाद नट यांनी सांगितले की, त्यांचे ९-१० सदस्यांचे कुटुंब छत्तीसगडमधील जंगल भागात वास्तव्यास आहे. तेथे शेती किंवा उदरनिर्वाहाचे अन्य ठोस साधन नसल्याने वर्षातील केवळ तीन महिने गावात राहता येते, त्यानंतर जवळपास ९ महिने विविध ठिकाणी स्थलांतर करून कुटुंबाचा चरितार्थ चालवावा लागतो. कुटुंबातील ३ गट सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन कसरतीचे खेळ सादर करतात. त्यातून दररोज सरासरी एक हजार ते बाराशे रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

फलटण शहरातील गजानन चौकातील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, श्रीराम विद्या भवन प्राथमिक विद्यालय व बालवाडी परिसरालगत दहा वर्षांची जितेन गाण्याच्या तालावर हातात बांबू घेऊन, डोक्यावर भांडी ठेवून बारीक दोरीवर तोल सांभाळत कसरतीचे खेळ सादर करत होती. रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक काही क्षण थांबून तिची कसरत पाहत होते. कसरत पूर्ण झाल्यानंतर काही नागरिक भावनिकतेपोटी तिच्या हातावर पैसे ठेवत होते. मात्र, ज्या वयात तिच्या हातात पाटी-पेन्सिल असायला हवी, त्या वयात कुटुंबाच्या दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या हातात बांबू आणि पायाखाली बारीक दोरी आली आहे, हे दृश्य अनेकांच्या मनाला चटका लावून जात होते. रस्त्यावरील वाहतूक, नागरिकांची गर्दी आणि कसरतीसाठी उपलब्ध होणारी असमतोल जागा यामुळे या मुलांच्या जीवाला कायम धोका असतो. क्षणभराचा तोल गेल्यास गंभीर अपघात होऊ शकतो. जितेननेही कसरत करताना एकदा दोरी बांधलेली खुटी सैल झाल्याने आपला तोल गेल्याचे सांगितले, मात्र दोरीखाली संरक्षणासाठी उभ्या असलेल्या भावाने प्रसंगावधान राखून तिला पकडल्याने अनर्थ टळला.

महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित या शाळांच्या परिसरात मुलांचा कसरतीचा कार्यक्रम सुरू असतानाच महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ संस्थेच्या कार्यालयात जात होते. त्यांचे लक्ष या चिमुकल्यांच्या जीवघेण्या कसरतीकडे गेले. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या मुलांना संस्थेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि त्यांचा सत्कार करून देणगी स्वरूपात आर्थिक मदतही केली. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे मुलांच्या चेहऱ्यावर काही क्षण आनंद उमटला. या वेळी बोलताना बेडकीहाळ म्हणाले की, या चिमुकल्या वयात मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल असायला हवी, हातात बांबू घेऊन रस्त्यावर कसरत करण्याची वेळ त्यांच्यावर येणे ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी या मुलांचे शिक्षण आणि सुरक्षित बालपण हिरावले जाऊ नये. प्रशासन, सामाजिक संस्था आणि समाजातील सक्षम घटकांनी अशा स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या मुलांच्या कलेला दाद देतानाच त्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा विचार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

जितेन इयत्ता तिसरीत शिकत असल्याचे सांगते, मात्र वर्षातील जवळपास नऊ महिने कुटुंबासोबत स्थलांतर करावे लागत असल्याने तिच्या शिक्षणात सातत्य राहत नाही. उन्हाळ्यातील तीन महिने गावी राहण्याचा कालावधी शाळेच्या सुट्टीत जातो, उर्वरित काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे शिक्षणाचा हक्क आणि आनंदाचे बालपण या दोन्हींपासून ही मुले वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परराज्यातून रोजगाराच्या शोधात आलेल्या कुटुंबांतील मुलांनी यापूर्वी हॉटेल, लॉज, बांधकाम, वीटभट्टी आणि विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांमध्ये कष्ट उपसताना नागरिकांनी पाहिले आहे. आता त्यातच रस्त्यावर कसरती करून कुटुंबाच्या चरितार्थासाठी पैसे गोळा करणाऱ्या चिमुकल्यांची भर पडली आहे. या मुलांच्या कसरतीकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यांच्या मागील आर्थिक परिस्थितीचा आणि बालहक्कांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर रस्त्यावर जीवघेण्या कसरती करणाऱ्या या बालकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. या चिमुकल्यांचे बालपण रस्त्यावरील तारेवर नव्हे, तर शिक्षणाच्या आणि आनंदाच्या अंगणात बहरले पाहिजे, अशीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Spread the love