‘देहदान हेच श्रेष्ठ दान!’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देहदात्यांच्या कुटुंबीयांचा विशेष गौरव!

कॉलेज सुरू झाल्यापासून ९ जणांचे देहदान; वैद्यकीय शिक्षण व अवयवदानाविषयी समाजात व्यापक जनजागृतीची गरज.

। लोकजागर वृत्त । फलटण । १९ ऑगस्ट २०२६ ।

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने देहदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा अत्यंत स्तुत्य आणि भावनिक कार्यक्रम पार पडला. समाजहितासाठी आणि भावी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे देहदान करणाऱ्या उदात्त दात्यांच्या कुटुंबीयांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

या सोहळ्यादरम्यान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता अंजली पाटील यांनी “देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला लाभलेली एक अमूल्य देणगी आहे” अशा शब्दांत कुटुंबांचे आभार मानले. या प्रसंगी वैद्यकीय महाविद्यातील सर्व प्राध्यापक तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती येथे हे कॉलेज सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९ जणांनी देहदान केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील एक देह २५ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोगी पडतो. एक देह रसायनांचा (केमिकल्स) वापर करून एक वर्षभर टिकवला जातो आणि अवयव विच्छेदन (Dissect) झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

अवयवदानाचे महत्त्व व जनजागृती:
कार्यक्रमात देहदानासोबतच अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून मोठी जनजागृती करण्यात आली. मेंदूमृत (Brain Dead) रुग्णांचे सर्व अवयव उपयोगात येतात. अपघाती प्रकरणांमध्येही (Accidental cases) अनेक अवयव उपयोगी पडतात; मात्र कर्करोगग्रस्तांचे (Cancer) अवयव स्वीकारले जात नाहीत. सध्या देशात अवयवांची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर असून पुरवठा मात्र अत्यंत कमी आहे.

भारतातील अवयवांची गरज आणि उपलब्धता (आकडेवारी):
कार्यक्रमादरम्यान सादर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात अवयवांची गरज व प्रत्यक्षात होणारे प्रत्यारोपण यांतील तफावत खालीलप्रमाणे आहे:

  • मूत्रपिंड: अंदाजे वार्षिक गरज १,७५,००० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण १३,४७६
  • यकृत: अंदाजे वार्षिक गरज ४०,००० ते ५०,००० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण ४,९०१
  • हृदय: अंदाजे वार्षिक गरज ५०,००० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण २५३
  • फुफ्फुसे: अंदाजे वार्षिक गरज ५०,००० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण २२८
  • अग्न्याशय: अंदाजे वार्षिक गरज २,५०० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण ४४
  • आतडे: अंदाजे वार्षिक गरज १,००० | २०२४ मध्ये प्रत्यारोपण ९

या भयावह तफावतीवर मात करण्यासाठी आणि रुग्णांना जीवनदान देण्यासाठी समाजात देहदान व अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Spread the love