२० ते २३ ऑक्टोबर दरम्यान चार दिवस चालणार भक्तिमय सोहळा; भजन, प्रवचन, भारुड आणि भव्य नगर प्रदक्षिणेची रेलचेल.
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑक्टोबर २०२६ ।
फलटण येथे श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज यांच्या १८८ व्या प्रगट दिनानिमित्त व रथोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार, २० ऑक्टोबर ते शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता रथोत्सवाची सुरुवात होणार असून, यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष, श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते रथ पूजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाची भजन व भारुड सेवा होणार आहे.
बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री हरिचरित्र वाचन व व्यासपीठावर चंदूकाका वादे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ ते ५ या वेळेत लिलावती महिला भजनी मंडळाची भजनसेवा, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत दशरथ महाराज फडतरे, धामणवाडी यांचे प्रवचन होणार आहे. रात्री ८ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलावंत विनोदी भारुडसम्राट चंद्रकांत बर्गे महाराज व सहकलाकार यांची भारुड सेवा सादर होणार आहे. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता महाभिषेक, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळांची भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत नामवंत भजनी मंडळांची सेवा होणार असून यामध्ये वीरशैव भजनी मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ, फलटण तसेच श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळ, कोळकी यांचा सहभाग असणार आहे. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मृतीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या प्रेरणेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत अंकुश महाराज ईवरे (पीएसआय), टाकळवाडा यांची प्रवचनसेवा होणार असून सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत कॅसेट फेम, चित्रपट फेम व यूट्यूब फेम ‘श्री साई समर्थ भजनी मंडळ’, विक्रमनगर, कोल्हापूर यांची भजनसेवा होणार आहे.
शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध द्वादशीच्या दिवशी श्री सद्गुरू हरिबाबा महाराज यांच्या प्रगट दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार असून सकाळी ६ वाजता महाभिषेक होईल. सकाळी १० वाजता श्रींच्या रथाचे प्रस्थान होणार असून, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. सर्व विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेस सुरुवात होणार असून श्रींच्या मंदिरापासून सुरू होणारी प्रदक्षिणा मलठणनंतर फलटण शहरातून पुढे जाणार आहे. या मार्गामध्ये उघडा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट आणि बुरुड गल्ली या ठिकाणांचा समावेश असून या मार्गावरील भाविकांनी व नागरिकांनी श्रींच्या नगर प्रदक्षिणेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार असून चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात महाभिषेक, भजनसेवा, प्रवचन, भारुड आणि नगर प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमांमधून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. या सोहळ्यास सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
