। लोकजागर । फलटण / अकलूज । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद आता सातारा जिल्ह्याच्या सीमा ओलांडून शेजारील सोलापूर जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या अकलूज शहरात समशेरसिंह आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदनाचे मोठे बॅनर झळकले असून, ते सध्या अकलूजकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सातत्याने ठेवलेला दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांचे कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघात सक्रिय आहेत. फलटणमधील सत्तापरिवर्तनाचे थेट कनेक्शन माढा मतदारसंघातील राजकीय समीकरणांशी जोडले जात असल्याने, अकलूजमधील या बॅनरबाजीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अकलूजमध्ये झळकलेल्या या बॅनरमुळे खासदार गटाचे राजकीय अस्तित्व सोलापूर जिल्ह्यातही किती भक्कम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. फलटणमधील विजयाचा हा उत्साह केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरला आहे.
