‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून तालुक्यातील ६० ते ७० टक्के प्रश्न मार्गी : आमदार सचिन पाटील

आदर्की बुद्रुक येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ व दाखल्यांचे वाटप

। लोकजागर । फलटण । रविवार, दि. १५ मार्च २०२६ ।

“शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी त्यांच्या गावातच सोडवणे, हा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी राबवलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ६० ते ७० टक्के अडचणी सोडवण्यात आम्हाला यश आले आहे,” असे प्रतिपादन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी केले.

फलटण तालुक्यात ७ मार्च व १४ मार्च २०२६ रोजी ‘महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १’ चे नियोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत आदर्की बुद्रुक येथे आमदार सचिन पाटील व सहविभागीय आयुक्त नंदकुमार कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान पार पडले. यावेळी विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी फलटणच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, कृषी अधिकारी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे, सुरेश भोईटे, बजरंग गावडे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळागाळापर्यंत योजना पोहोचवल्या: यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “यापूर्वी सर्वसामान्य लोकांना कामासाठी तालुक्याला वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, आता शासन स्वतः लोकांच्या दारी जात असल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत. शासन आपले काम करत असल्याची जागृती लोकांमध्ये झाली आहे. आम्ही जवळपास ५६ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांचे प्रश्न निकाली काढले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो आहोत याचा मनस्वी आनंद वाटतो.”

कर्जमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन: शासनाने नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी आणि इतर विविध योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवला जात आहे. नागरिकांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या अभियानांतर्गत आदर्की परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घेतला.

Spread the love