डिजिटल अरेस्टद्वारे वृद्धांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा केला होता पर्दाफाश; ५८ कोटींच्या सायबर गुन्ह्याचाही उलगडा.
। लोकजागर । मुंबई । २ मे २०२६ ।
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल यंदाचे मानाचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (पदक) प्राप्त झाले आहे. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय? सप्टेंबर २०२५ मध्ये र.अ. की. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून ७० लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली होती. आरोपींनी एटीएस कंट्रोल (नवी दिल्ली) आणि एनआयएचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते बोलत असल्याचे भासवून फिर्यादीचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे खोटे सांगितले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात यांनी तपासाची चक्रे फिरवली.
अहोरात्र १४ दिवस शोधमोहीम: तांत्रिक बाबी आणि बँक खात्यांच्या व्यवहारांचा तपास करत खरात यांनी गुजरात आणि राजस्थानमध्ये सलग १४ दिवस सापळा रचला. या मोहिमेत त्यांनी एकूण ६ मुख्य आरोपींना अटक केली. तसेच, लुटलेली रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून यूएस डॉलरमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका अन्य आरोपीलाही बेड्या ठोकल्या. अशा एकूण ७ आरोपींना अटक करून खरात यांनी आंतरराष्ट्रीय लिंक असलेली ही टोळी उघडकीस आणली.
५८ कोटींच्या गुन्ह्याशी कनेक्शन: तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, याच आरोपींचा महाराष्ट्र सायबर विभागाकडे तपास सुरू असलेल्या ५८ कोटी रुपयांच्या मोठ्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणातही सहभाग होता. त्यांच्या या कौशल्यामुळे एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा अंत झाला आहे.
सन्मानाची मोहोर: दरोडेखोर आणि अघोर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध प्रभावी कारवाई केल्याबद्दल ‘प्रवर्ग २’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी योगेश खरात यांना हे पदक देऊन गौरविले आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
