अहिंसा आणि करुणेचा संदेश देत गोसेवेचा संकल्प; सेंद्रिय शेती आणि केमिकलमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे जैन सोशल ग्रुपचे नियोजन.
। लोकजागर । फलटण । ०२ एप्रिल २०२६ ।
भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या वतीने शहरातील यशोदा समृद्ध गोपालन गोशाळेत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. महावीरांच्या अहिंसा, करुणा आणि ‘सर्व भूते दया’ या तत्त्वांचे पालन करत ग्रुपच्या सदस्यांनी गोशाळेतील गाईंना चाऱ्याचे दान केले आणि फळांचे वाटप केले. या उपक्रमातून केवळ धार्मिक उत्सवच नव्हे, तर पर्यावरण आणि पशुसंवर्धनाचा मोलाचा संदेश समाजाला देण्यात आला आहे.
याप्रसंगी जैन सोशल ग्रुपच्या वतीने “गाईची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” असल्याचे सांगत, फलटणमध्ये गाईंसाठी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला. भविष्यात एकाच छताखाली अधिक गाईंना सुरक्षित निवारा देऊन सेंद्रिय शेती आणि शेणखताचा वापर वाढवून केमिकलमुक्त शेती संकल्पना राबवण्याचे नियोजन असल्याचे ग्रुप सदस्यांनी स्पष्ट केले. तसेच, यशोदा गोशाळेच्या विस्तारीकरणासाठी नागरिकांनी सढळ हाताने पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यशोदा समृद्ध गोपालन गोशाळेचे संचालक सौरभ सुनील सोनवले यांनी जैन सोशल ग्रुपचे आभार मानले. समाजातील अशा सकारात्मक दातृत्वामुळे गोशाळेच्या कार्याला बळ मिळते आणि पशुधनाची निगा राखणे सुलभ होते, असे त्यांनी नमूद केले. महावीर जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे फलटण शहरात सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श या निमित्ताने समोर आला आहे.
