श्री जितोबा विद्यालय जिंती येथे नवागतांचे उत्साहात स्वागत; औक्षण आणि ‘सेल्फी पॉईंट’ ठरला विद्यार्थ्यांसाठी आकर्षण

शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकांचे वाटप; स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव.

। लोकजागर । फलटण / जिंती । १६ जून २०२६ ।

रयत शिक्षण संस्थेचे प्रसिद्ध श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण) येथे नेहमीप्रमाणे ‘विद्यार्थी’ हाच केंद्रबिंदू मानून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत आनंददायी वातावरणात करण्यात आली. शाळेचा पहिला दिवस हा केवळ औपचारिक सुरुवात न राहता, ‘नवागतांचे स्वागत’ आणि ‘नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांचे भारतीय संस्कृतीनुसार औक्षण करून, त्यांना गुलाबपुष्प आणि शिक्षण विभागामार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यालयात उभारण्यात आलेला ‘विशेष सेल्फी पॉईंट’! नवीन प्रवेशित सर्व मुला-मुलींचे या सेल्फी पॉईंटवर आनंदी चेहऱ्याने फोटो काढण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या आगळ्यावेगळ्या आणि आपुलकीच्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमधील भीती पळून गेली आणि त्यांच्यासाठी हा प्रवेशोत्सव म्हणजे एक मोठा ‘आनंदोत्सव’ ठरला.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान आणि बिस्किट वाटप: याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गेल्या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा गौरव सोहळा स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य श्री. राजेंद्र रणवरे, श्री. प्रकाशराव रणवरे, श्री. महादेवराव रणवरे, श्री. नवनाथ रणवरे आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्कूल कमिटीचे सदस्य प्रकाशराव रणवरे व महादेवराव रणवरे यांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आणि अभ्यासपूर्ण प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक श्री. ताराचंद्र आवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. विद्या जमदाडे यांनी मानले. हा संपूर्ण प्रवेशोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाहीन हन्नुरे, जीवन देशमुख, अर्चना सोनवलकर, अंकुश सोळंकी, अमोल जाधव, मधुकर जगताप आणि राजेंद्र घाडगे या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करून गोड तोंडाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.

Spread the love