लोकशाहीची पायमल्ली झाल्याचा आरोप करत शिवसेना व राष्ट्रवादीचा सभात्याग; भाजपच्या दोन तर भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन अशा चौघांची सभापती पदी वर्णी.
। लोकजागर । सातारा । ०५ एप्रिल २०२६ ।
सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी शनिवारी आयोजित केलेली विशेष सभा राजकीय नाट्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी सदस्यांनी या निवड प्रक्रियेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला. विरोधकांच्या अनुपस्थितीमुळे रिक्त असलेल्या सभागृहात सत्ताधारी गटाचे वर्चस्व राहिले आणि चारही सभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये भाजपच्या दोन तर भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेत समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांसाठी नामनिर्देशनपत्रे मागवण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या बावधन गटाच्या ऋतुजा विराज शिंदे (महिला व बाल कल्याण), भाजपचे खेड बुद्रुक गटाचे ऋषीकेश धायगुडे-पाटील (समाज कल्याण), राष्ट्रवादीच्या बुध गटाच्या लता अविनाश कर्णे आणि भाजपच्या पुसेसावळी गटाच्या तेजस्विनी विक्रमशिल कदम (विषय समिती सभापती) या चार सदस्यांचेच अर्ज दाखल झाले. प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आणि छाननीमध्ये कोणतेही आक्षेप न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या चौघांची निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.
लोकशाहीच्या हत्येचा आरोप आणि बहिष्कार: दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी सदस्यांनी या निवडीवर कडाडून टीका केली आहे. अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जाणीवपूर्वक पोलीस कारवाईत अडकवून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत, “ज्या प्रक्रियेत पारदर्शकता नाही, तिथे सहभागी होणार नाही,” अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतली.
या निवड प्रक्रियेवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव आदी अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, विरोधकांच्या बहिष्कारामुळे या निवडीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली असून साताऱ्यातील सत्तासंघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान या निवडप्रक्रियेनंतर या चारीही सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज दादा घोरपडे, ज्येष्ठ नेते माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपा सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी धैर्यशीलदादा कदम, सुनील तात्या काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण आबा गोरे, युवानेते विराज शिंदे, युवा नेते विक्रमशील कदम, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभीताई भोसले, जिल्हा परिषद सदस्या सौ.ऋतुजा अभिजीत जगताप, कामेश कांबळे, सातारा जिल्हा परिषदेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते.
