‘श्रीराम’ कारखाना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यास देण्याचा ठराव मंजूर; विशेष सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

जवाहर समूहासोबतचा करार रद्द; कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू ठेवणे गरजेचे- संजीवराजे नाईक निंबाळकर.

। लोकजागर । फलटण । १९ मे २०२६ ।

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे दोन हजार सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडली. या सभेमध्ये कल्लाप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबतचा भागीदारी करार रद्द करून, ‘श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला कारखाना चालविण्यास देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. ८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार कारखाना, अर्कशाळा आणि मद्य विभाग सहयोगी तत्त्वावर चालवण्यास देण्याच्या या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

या महत्त्वपूर्ण सभेला आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे माजी अध्यक्ष नितीन भोसले, धनंजय पवार, रेश्माताई भोसले आणि सचिन सूर्यवंशी (बेडके) उपस्थित होते. तसेच जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभासदांना नोटीस आणि ओळखपत्रांची रीतसर तपासणी केल्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जात होता.

सभा सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यावे, तसेच पुढे चालवायला घेणाऱ्या संस्थेचा कोणताही आर्थिक बोजा कारखान्यावर किंवा सभासदांवर पडू नये, अशी मागणी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्यावर उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच कामकाज केले जाईल, अशी ग्वाही दिली. कारखान्याचे नक्त मूल्य उणे (Negative Net Worth) असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे शेतकरी, सभासद, कामगार आणि ऊस वाहतूकदारांचे हित जपण्यासाठी कारखाना सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे असून हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, जवाहर कारखान्याने अर्ध्यातूनच करार मोडल्यामुळे कारखाना आणि सभासदांचे मोठे नुकसान झाले असल्याचे मत निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आणि ॲड. नरसिंह निकम यांनी व्यक्त केले. मंत्री समिती व कोल्हापूर खंडपीठाच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. संजीवराजे यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावत हा केवळ सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कारखाना व अर्कशाळा चालवण्यासाठी ‘शरयू’ आणि ‘श्री दत्त इंडिया’ यांच्या निविदा आल्या होत्या, ज्यामध्ये ‘श्री दत्त इंडिया’कडून साडेसहा कोटी रुपयांचे वार्षिक भाडे मिळणार असल्याने त्यांना कारखाना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केले, तर आभार सुखदेव बेलदार यांनी मानले.

Spread the love