नागपंचमीनिमित्त फलटण नगरपरिषदेतर्फे महिलांसाठी विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम; १७ ऑगस्टला शनिनगर बागेत आयोजन!

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती; जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑगस्ट २०२६ ।

श्रावण महिना आणि सण-उत्सवांच्या रेलचेलीत महिलांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण असणाऱ्या ‘नागपंचमी’च्या निमित्ताने फलटण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व महिलांसाठी एका खास मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

नागपंचमीच्या दिवशी महिला एकत्र येऊन नागदेवतेची पूजा करतात आणि झिम्मा, फुगडी, झोका खेळत सण साजरा करतात. महिलांच्या याच उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी आणि दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळून सांस्कृतिक परंपरा जपता यावी, या उद्देशाने नगरपरिषदेने हा पुढाकार घेतला आहे.

येत्या सोमवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता शनिनगर येथील नगरपरिषदेच्या बागेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महिलांना विविध खेळांचा आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

तरी फलटण शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करावा, असे जाहीर आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव आणि फलटण नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love