हनुमंतराव लोंढे यांचा माहिती संकलनाचा उपक्रम स्तुत्य; जि. प. सदस्या ज्योती मोरे यांच्याकडून गौरव

। लोकजागर । फलटण । १९ मे २०२६ ।

फलटण तालुक्यातील सर्व गावांमधून सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक अशी सर्वसमावेशक माहिती संकलित करण्याचा हनुमंतराव लोंढे यांनी हाती घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. ज्योती मोरे यांनी व्यक्त केले.

बरड (ता. फलटण) येथील ‘नवयान संशोधन उन्नती आणि शिक्षण-प्रशिक्षण संस्थे’चे चेअरमन तथा ‘गजराज शेतकरी स्वयंसहायता समूहा’चे अध्यक्ष हनुमंतराव लोंढे यांनी सौ. ज्योती मोरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या विशेष उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

या भेटीदरम्यान हनुमंतराव लोंढे यांनी आपल्या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत फलटण तालुक्यातील तब्बल १३१ गावांचा नामोल्लेख सादर करून दाखवला. त्यांची ही स्मरणशक्ती आणि तालुक्याविषयीची आत्मीयता पाहून मोरे कुटुंब भारावून गेले. या प्रसंगी मोरे कुटुंबाच्या वतीने हनुमंतराव लोंढे यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, या अनोख्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना हनुमंतराव लोंढे यांनी ‘लोकजागर’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, फलटण तालुक्यातील प्रत्येक गावातील सामाजिक, आर्थिक, आरोग्य, कृषी आणि सिंचन अशा विविध महत्त्वपूर्ण घटकांची सर्वसमावेशक माहिती एका सुनियोजित प्रश्नावलीद्वारे संकलित केली जात आहे. या संकलित माहितीचे शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करून फलटण तालुक्याचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात तालुक्यासाठी विविध शासकीय व विकासात्मक योजना आखताना आणि त्या प्रभावीपणे राबवताना निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Spread the love