४२ अंश सेल्सिअस तापमानात दिवसभर प्रशिक्षणाचे आयोजन; ‘दगाफटका झाल्यास जबाबदार कोण?’ शिक्षक संघटनांचा सवाल.
। लोकजागर । फलटण । ५ मे २०२६ ।
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला १ मे पासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद हद्दीतील ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण ५ ते ७ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, सध्या शहराचे तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असतानाही प्रशासनाने हे प्रशिक्षण सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ठेवल्याने शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाचा दुजाभाव आणि शिक्षकांचे प्रश्न:
- फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे तीन टप्प्यातील प्रशिक्षण सकाळच्या सत्रात पार पडले आहे.
- ग्रामीण भागातील प्रशिक्षण सकाळी झाले असताना फलटण शहरातील शिक्षकांबाबत प्रशासनाकडून दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.
- उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.
- अशा परिस्थितीत एखाद्या शिक्षकास उष्माघाताने दगाफटका झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सकाळ सत्रात प्रशिक्षणाची मागणी धुडकावली: वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षक संघटनांनी हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावत दुपारच्या सत्रासह दिवसभर प्रशिक्षण घेण्याचा घाट घातला आहे. फलटण शहरातील सर्व १३ प्रभागांमधील कामासाठी नियुक्त केलेले ९२ प्रगणक आणि १८ पर्यवेक्षक या निर्णयामुळे प्रशासनावर नाराज आहेत.
या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रशिक्षणाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
