एकूण ४७२ मतदार करणार भाग्य निश्चित; गतवेळच्या अटीतटीच्या लढतीमुळे यंदाच्या रणसंग्रामाकडे सर्वांचे लक्ष.
। लोकजागर । सातारा / सांगली । १९ मे २०२६ ।
विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम ‘माननीय भारत निवडणूक आयोगा’ने जाहीर केला आहे. या घोषणेसोबतच सांगली आणि सातारा जिल्ह्यांत निवडणूक आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे, अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ही निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते; यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्याने निवडणूक लांबली होती, मात्र आता हे निकष पूर्ण झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर हा कार्यक्रम जाहीर झाला.
या निवडणुकीसाठी सोमवार, २५ मे २०२६ रोजी रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, १ जून २०२६ पर्यंत असेल. मंगळवार, २ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर गुरुवार, ४ जून २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडेल. सोमवार, २२ जून रोजी मतमोजणी होऊन गुरुवार, २५ जून २०२६ पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर सांगली व साताऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष व सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ४७२ मतदार उमेदवारांचे भाग्य निश्चित करणार असून, त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतींचे ३९६ आणि जिल्हा परिषदेचे ७६ मतदार आहेत. साताऱ्यातील मतदारांसाठी सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण या उपविभाग मुख्यालयांवर एकूण ७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
दरम्यान, गतवेळी झालेली सांगलीचे मोहनराव कदम विरुद्ध साताऱ्याचे शेखर गोरे ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. पैशांचे आणि राजकीय गणितांचे मोठे राजकारण या निवडणुकीत पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. गत निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत, यंदा ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अटीतटीची रंगणार की नेहमीप्रमाणे काही पडद्यामागच्या घडामोडींमुळे बिनविरोध होणार, याबाबत सातारा-सांगलीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
