काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; मविआकडून वरिष्ठ नेत्यांची ‘निरीक्षक’ म्हणून नियुक्ती तर महायुतीवर घोडेबाजाराचा गंभीर आरोप.
। लोकजागर । मुंबई / फलटण । २९ मे २०२६ ।
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत आला आहे. १७ पैकी तब्बल १५ जागांवर मविआचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांवरही लवकरच अंतिम निर्णय होईल. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘सांगली-सातारा’ ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष लढवणार आहे, अशी अधिकृत माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे आणि माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
असे आहे महाविकास आघाडीचे प्राथमिक जागावाटप: बैठकीत ठरलेल्या सूत्रानुसार, काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि धाराशिव-लातूर-बीड अशा ७ जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा अशा ३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वाट्याला रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर अशा ४ जागा आल्या आहेत. उर्वरित दोन जागांवर महायुतीचे उमेदवार पाहून रणनीती आखली जाणार आहे.
निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिग्गज निरीक्षकांची फौज तैनात: विधान परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद पणाला लावण्यासाठी काँग्रेसने प्रत्येक जागेसाठी वरिष्ठ नेत्यांची ‘निरीक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघासाठी खासदार प्रणिती शिंदे, सांगली-सातारा मतदारसंघासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि पुणे जागेसाठी विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय अहिल्यानगरसाठी बाळासाहेब थोरात, जळगावसाठी खासदार चंद्रकांत हंडोरे, नाशिकसाठी के. सी. पाडवी, नांदेडसाठी खासदार रवींद्र चव्हाण, धाराशिव-लातूर-बीडसाठी अमित देशमुख, परभणी-हिंगोलीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर-जालनासाठी तुकाराम रेंगे पाटील, यवतमाळसाठी माणिकराव ठाकरे, भंडारा-गोंदियासाठी आ. नाना पटोले, वर्धा-चंद्रपूरसाठी विजय वडेट्टीवार, अमरावतीसाठी यशोमती ठाकूर, नागपूर पोटनिवडणुकीसाठी डॉ. नितीन राऊत, ठाणे मतदारसंघासाठी नसिम खान आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मुझफ्फर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुतीकडून पैशांचा पूर आणि घोडेबाजार; प्रदेशाध्यक्षांचा कडाडून हल्ला: पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. “विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मविआचे नगरसेवक पळवले जात असून त्यांना ५-५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स दिला जात आहे. सध्या बाजारात ‘बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या’ असा खेळ सुरू असून, सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच अंतर्गत पळवापळवी सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीचा भाजप महायुतीने निव्वळ घोडेबाजार बनवला आहे. मात्र, या पैशांच्या पैशांच्या मस्तीविरोधात आणि दंडेलशाहीविरोधात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने रिंगणात उतरली आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
